बेळगाव लाईव्ह: बेळगाव लाईव्ह : वीरशैव लिंगायत समाजाची निंदा करणाऱ्यांविरुद्ध संताप व्यक्त करताना कण्हेरी मठाच्या स्वामीजींनी वापरलेल्या एका शब्दाचा आधार घेत, त्यांच्या जिल्हा प्रवेशावर बंदी घालून राज्य सरकार आपल्या मनाला येईल त्याप्रमाणे मनमानी पद्धतीने वागत आहे, अशी टीका सूळिबेले चक्रवर्ती यांनी केली.
आज बेळगाव येथे हिंदू नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेल्या अनेक वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाजाला विविध प्रकारे तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता पुन्हा त्याला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जात आहे. हिंदू धर्माला जाती-जातींमध्ये विभागून तुष्टीकरण करणे हेच सरकारचे काम आहे, अशा शब्दांत त्यांनी राज्य सरकारच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली.
कण्हेरी मठाच्या स्वामीजींच्या जिल्हा प्रवेशावर बंदी घालण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाला संपूर्ण हिंदू समाज आणि वीरशैव लिंगायत समाज विरोध करत आहे. कर्नाटकच्या बहुतेक सर्व तालुक्यांतून सुमारे ५००० सह्या गोळा करण्याचे अभियान सुरू करून तहसीलदारांना निवेदन देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
भाजपचे प्रवक्ते एम.बी. जिरली म्हणाले की, आज हिंदू नेत्यांची बैठक घेण्यात आली. कण्हेरी स्वामीजी हे सेंद्रिय शेती आणि शेतकऱ्यांची उन्नती करणारे आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत. ते हिंदू समाजासाठी आधुनिक समाजाचे समर्थ रामदास आहेत. “त्यांना विरोध करणाऱ्या सरकारच्या विरोधात प्रत्येक तालुक्यातून ५ हजार लोकांच्या सह्या गोळा करून अभियान चालवले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ, अरविंद बेल्लद, सी.सी. पाटील, माजी खासदार रमेश कत्ती यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.





