बेळगाव लाईव्ह :धोकादायक मांजा दोरा विक्री विरोधात पोलिसांनी कारवाई करत मांजा दोरे जप्त केले आहेत.
बेळगाव शहरात पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक मांजा दोऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. हे मांजा दोरे अतिशय धोकादायक असून वाहनचालक तसेच नागरिकांच्या गळ्याला किंवा शरीराच्या इतर भागांना इजा किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरातील मार्केट व एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दुकानांवर छापे टाकण्यात आले.
मार्केट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोळगल्लीत असलेल्या दुकानाचे मालक फारुख अहमद गुलाब अहमद मुल्ला (वय 75, रा. कोळगली, बेलगाव) आणि एपीएमसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वैभव नगर येथील दुकानाचे मालक जमीर कुल्लुद्दीन कशनट्टी (रा. वैभव नगर, बेळगाव) हे दोघेही आपल्या दुकानात घातक मांजा दोरे विकत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी छापा टाकून मांजा दोऱ्यांचे रोल जप्त केले असून, दोघांविरुद्ध के.पी. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
आगामी काळातही शहरात अशा प्रकारचे घातक मांजा दोरे विक्रीस न ठेवावेत, अशी सर्व दुकानदारांना सूचना देण्यात आली आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांना असे मांजा दोरे वापरू नयेत याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
APMC पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड – 5 आरोपी अटकेत
दि. 20/10/2025 रोजी आरोपी विनायक मोतिराम सोनरवाडी (40, रा. ज्योतीनगर, कंग्राळी KH), सिद्धार्थ बसप्पा नागनूर (34, रा. पाटील गल्ली, ज्योतीनगर), शिवानंद चन्नबसप्पा उगरखोड (35, रा. ज्योतीनगर), राजेंद्र बाबुराव सुतार (62, रा. मार्कंडेय नगर), व दशरथ पांडुरंग पाटील (रा. ज्योतीनगर, कंग्राळी KH) हे सर्वजण एपीएमसी मार्केट यार्ड बसस्थानकाजवळ सार्वजनिक ठिकाणी “अंदर-बाहर” नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी पथकाने धाड टाकली.
धाडीच्या वेळी पोलिसांनी आरोपींकडून 2010 रोकड आणि इस्पीटच्या पत्त्यांचा संच जप्त केला. या प्रकरणी APMC पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 136/2025 कलम 87, के.पी. कायद्यानुसार गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे.
वरील कारवाई करणाऱ्या पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक व कर्मचारी यांचे कौतुक पोलीस आयुक्त तसेच डीसीपी शहर यांनी केले आहे.



