बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यातील सुप्रसिद्ध युवा किर्तनकार ह.भ.प. विठ्ठल पाटील महाराज किरहलशी यांना श्री क्षेत्र आळंदी येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली संजीवनी समाधी मंदिरात किर्तन सेवेचा मान मिळाला आहे. १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते ८ वाजेदरम्यान त्यांना ही सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ज्ञानेश्वर माऊलींच्या दरबारात किर्तन सेवा करणे हे अत्यंत दुर्मिळ मानले जात असल्याने, ही घटना बेळगाव जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी ठरली आहे.
श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात किर्तन सेवा करणे हे अत्यंत दुर्मिळ मानले जाते. परंतु विठ्ठल पाटील महाराज यांना माऊलींच्या आशीर्वादाने ही सेवा लाभली आहे. वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षापासून त्यांनी किर्तन आणि प्रवचनाची वाटचाल सुरू केली असून, आज ते कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये आपली किर्तन सेवा देत आहेत.
गोवा व महाराष्ट्रातील मुख्यमंत्री, तसेच आरोग्यमंत्री यांच्याकडून त्यांना अनेक वेळा सन्मानित करण्यात आले आहे. तसेच झी टॉकीज, मराठी बाणा यांसारख्या नामांकित दूरदर्शन वाहिन्यांवर त्यांची किर्तन सेवा नियमित प्रसारित होत असते.
श्री ज्ञानोबा माऊलींच्या दरबारात विठ्ठल पाटील महाराज यांना किर्तन करण्याची संधी मिळणे ही बेळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या प्रसंगी बेळगाव, खानापूर, रामनगर, चंदगड परिसरातील वारकरी संप्रदायातील भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या किर्तन सेवेचा लाभ घ्यावा, “असे आवाहन ह.भ.प. नवनाथ पाटील (बेळगाव) यांनी केले आहे.”


