बेळगाव लाईव्ह : वंटमुरी घाटात झालेल्या अपघातात खानापूर तालुक्यातील चापगाव येथील युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी पहाटे घडली आहे.श्रीधर निंगाप्पा पाटील (वय 30 वर्ष) रा. चापगाव खानापूर असे या घटनेत मयत झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे.
सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार खानापूर तालुक्यातील चापगाव येथील एक दुचाकीस्वार नवरात्रीला आपल्या गावी येऊन परत इचलकरंजी येथील आपल्या कामावर हजर होण्यासाठी जात असताना बुधवारी पहाटे 5:30 वाजेच्या सुमारास वंटमुरी घाटात त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन, त्याचा जागीच मृत्यू झाला.
चापगाव येथील युवक श्रीधर निंगाप्पा पाटील (वय 30 वर्ष) हा गवंडी कामा निमित्त इचलकरंजी या ठिकाणी रहात होता. नवरात्रीसाठी तो गावी आला होता. नवरात्रीतील पूजा विधी आटपुन परत आपल्या इचलकरंजी येथील कामावर जाण्यासाठी आज बुधवार दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी पहाटे निघाला असताना, वंटमुरी घाटामध्ये 5:30 वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. श्रीधरचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. त्याच्या पश्चात पत्नी आई-वडील लहान भाऊ असा परिवार आहे.

अपघाताची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली असून पोलिसांनी जागेचा पंचनामा करून बेळगाव येथील सिव्हिल रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह आणला आहे.
उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर चापगाव या ठिकाणी श्रीधर पाटील याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच चापगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते व तालुका पंचायतीचे माजी सभापती व भाजपाचे जनरल सेक्रेटरी मल्लाप्पा मारीहाळ तसेच चापगाव ग्रामपंचायतचे माजी अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते रमेश धबाले यांनी घटनास्थळी भेट देऊन कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत. थोड्या वेळानंतर मृतदेह ताब्यात घेऊन चापगाव कडे येणार असल्याचे समजते.


