बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी रात्री खडक गल्ली येथे झालेल्या दगडफेकी प्रकरणी मार्केट पोलिसांनी या घटनेसंदर्भात एकूण ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १० जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील खडक गल्ली येथे शुक्रवारी रात्री मेहबूब सुभानी दर्ग्याच्या उरुस मिरवणुकीदरम्यान दगडफेकीची घटना घडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही मिरवणूक दरवर्षी शनिवार खूट आणि जालगार गल्लीतून जात असते, मात्र यावर्षी मिरवणुकीने परवानगीशिवाय आपला नेहमीचा मार्ग बदलून खडक गल्लीत प्रवेश केल्याचा आरोप आहे.
या मिरवणुकीतील सहभागींनी घोषणाबाजी सुरू केल्याने वाद सुरू झाला. स्थानिक हिंदू रहिवाशांनी या घोषणेवर आणि मिरवणुकीचा मार्ग बदलण्यावर आक्षेप घेतल्याने शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानंतर लगेचच दगडफेक सुरू झाली. तसेच, मिरवणुकीतील काही युवकांनी धार्मिक घोषणा देत तलवारीही दाखवल्याचा आरोप होत आहे.
खडक गल्लीतील रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर बेळगाव मार्केट पोलिसांनी या घटनेसंदर्भात एकूण ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी १० जणांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. या प्रकरणी आतापर्यंत ११ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
डी.सी.पी. नारायण बरमणी आणि दोन ए.सी.पी. यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मिरवणूक त्वरित पांगवण्यात आली असून, पुढील तणाव टाळण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
परवानगीशिवाय मिरवणुकीचा मार्ग बदलून हिंसाचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. ही घटना खडेबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, या घटनेत सामील असलेल्या सर्व दोषींना ओळखण्यासाठी तपास सुरू आहे.




