बेळगाव लाईव्ह : बेळगाव येथील कन्नड संघटनांच्या नेत्यांनी कन्नड आणि संस्कृती खात्याचे मंत्री शिवराज तंगडगी यांची बुधवारी दुपारी बेंगळुरू येथील कुमार कृपा अतिथीगृहात भेट घेऊन सीमाभागातील समस्यांवर चर्चा केली.
यावेळी राज्योत्सव, कन्नड सीमा भवनची देखभाल आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर विचारमंथन करण्यात आले. या बैठकीला सीमा व्यवहार मंत्री एच. के. पाटील हे देखील उपस्थित होते.
कन्नड संघटना आणि कन्नड सीमा समन्वयक समिती सीमाभागातील प्रश्नांवर सक्रियपणे आवाज उठवत असताना, महाराष्ट्र राज्याच्या सीमा समन्वय समितीकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याची तीव्र भावना मराठी भाषिकांमध्ये आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांच्या समस्यांसंदर्भात ही समिती कोणते ठोस निर्णय घेणार किंवा कोणत्या उपाययोजना राबवणार, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. ‘सर्वोच्च न्यायालयात लढा सुरू आहे’
या पारंपरिक उत्तरापलीकडे जाऊन मराठी भाषिकांना दैनंदिन जीवन, शिक्षण आणि प्रशासकीय स्तरावर भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी समिती सक्रियपणे कोणती पाऊले उचलणार, याबद्दल साशंकता आणि नाराजी सीमाभागात व्यक्त होत आहे.


