बेळगाव लाईव्ह : ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्यात विजय मिळवणाऱ्या वीरांगणा कित्तूर चन्नम्माच्या शौर्याचे स्मरण म्हणून साजरा करण्यात येणारा ‘चन्नम्मा कित्तूर उत्सव’ तुषारवृष्टीच्या वातावरणातही मोठ्या उत्साहात आणि आनंदात सुरू झाला.
चन्नम्माच्या विजयाचे प्रतीक असलेली ‘विजय ज्योत’ राज्याच्या विविध भागांतून प्रवास करून कित्तूरमध्ये दाखल झाली. जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी चन्नम्मा चौकात या विजय ज्योतीचे स्वागत केले आणि कित्तूर संस्थानाचा ध्वजारोहण करून उत्सवाचा औपचारिक शुभारंभ केला.
या वेळी कित्तूर चन्नम्मा, संगोळी रायण्णा आणि अमटूर बाळप्पा यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी माल्यार्पण केले. चन्नम्मा कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, कलमठाचे मडीवाळ राजयोगेंद्र स्वामीजी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमशंकर गुळेद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. यापूर्वी दरवर्षीप्रमाणे यंदाही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी गडादमरडी येथे कित्तूर उत्सवाचा ध्वजारोहण केला.
उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेल्या अत्यंत आकर्षक लोककलांच्या चित्ररथ मिरवणुकीला महिला व बालकल्याण विकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चन्नम्मा कित्तूरच्या चन्नम्मा चौकात हिरवे निशाण दाखवून चित्ररथ मिरवणुकीचा शुभारंभ केला. तेथून सुरू झालेल्या या लोककलांच्या प्रवाहात राज्यातील लोककलांचे अद्भुत दर्शन घडले. विविध प्रकारच्या लोककलापथकांच्या सादरीकरणातून या आकर्षक मिरवणुकीची शोभा वाढवली.




पावसाची पर्वा न करता, आकर्षक लोककलांच्या या मिरवणुकीतून विविध सरकारी विभागांनी शासनाच्या योजना आणि सुविधांवर आधारित सादर केलेले चित्ररथ उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
किल्ल्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शन दालनाचे आणि फळ-पुष्प प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले. या प्रसंगी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, राज्य वित्त संस्थेचे अध्यक्ष महांतेश कौजलगी, आमदार बाबासाहेब पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले होते.
कृषी, आरोग्य, उद्यानविद्या संबंधित १२१ प्रदर्शन दालने आणि विविध ३७ खाद्यपदार्थांची दालने उभारण्यात आली आहेत. दिवाळी आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर आणि आसपासच्या गावांतील शेकडो लोकांनी पावसाची तमा न बाळगता सकाळपासूनच या प्रदर्शन दालनांना भेट देऊन उत्सवाची रंगत वाढवली.
शनिवार 25 ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव दौऱ्यावर येणार असून कित्तूर उत्सवात सहभागी होणार आहेत. सायंकाळी चार वाजता हुबळी मार्गे ते बेळगाव ला येणार आहेत. सायंकाळी सात वाजता कित्तूर उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी होणार असून त्यानंतर रात्री किल्ला तलावाजवळील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.




