बेळगाव लाईव्ह : बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाने भारतीय वीर आणि शहीदांना सन्मानित करण्याच्या उपक्रमाचा भाग म्हणून मोठे पाऊल उचलले आहे. बोर्डाच्या हद्दीतील ३४ ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याची सुरुवात थेट छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने झाली आहे. कॅम्प परिसरातील पूर्वीच्या ‘हाय स्ट्रीट’ या रस्त्याचे नाव बदलून आता अधिकृतपणे ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ असे करण्यात आले असून, तसा फलकही उभारण्यात आला आहे. आठ महिन्यापूर्वी झालेल्या ठरावाची गुरुवारी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनाच नाही, तर इतर राष्ट्रीय वीरांनाही सन्मानित केले आहे. ‘नॉर्थ टेलिग्राफ रोड’ला आता बेळवडी मल्लम्मा, ‘स्मार्ट रोड’ला शहीद विंग कमांडर हनुमंतराव सारथी, ‘पिकेट रोड’ला लान्स नायक हनुमंतप्पा रोड, कॅम्पमधील ‘पोस्ट गार्डन रोड’ला गंगुबाई हनगल आणि ‘एक्साईज गार्डन’ला पं. भीमसेन जोशी यांचे नाव देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने केलेल्या या नामकरणाबद्दल सोशल मीडियावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
एका नेटकर्याने नामांतराच्या निर्णयावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “कॅम्प परिसरातील हाय स्ट्रीटचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मार्ग’ असे नामकरण करण्यावर लोकांचा कोणताही आक्षेप नाही, पण अनादी काळापासून ‘हाय स्ट्रीट’ या नावाची एक वेगळी ओळख आहे. याच धर्तीवर, आपण सेंट जोसेफ कॉन्व्हेंटचे नाव ‘वीर राणी चन्नम्मा शाळा’ आणि सेंट पॉलचे नाव ‘वीर राजा संगोळ्ळी रायण्णा शाळा’ असे करू शकतो!” असे मत त्यांनी व्यक्त केले.
या निर्णयाचे समर्थन करताना अन्य दोघांनी प्रतिक्रिया दिली की, “उत्कृष्ट पुढाकार, प्रत्येकाच्या हृदयात विराजमान असलेल्या महान राजाच्या नावाने सुरुवात झाली!”, तर दुसऱ्याने “जुने ते सोने,” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

याउलट, एका नागरिकाने तीव्र नाराजी व्यक्त करताना, “त्याऐवजी खड्डे नसलेले चांगले रस्ते बांधण्यावर, कचरा व्यवस्थापनावर आणि शहरात स्वच्छता राखण्यावर लक्ष केंद्रित करा. रस्त्यांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव देऊन जनतेचे लक्ष का विचलित करायचे?” अशा शब्दांत प्रशासनाला सुनावले.
नामकरणाच्या पद्धतीवरही टीका झाली. एका नेटकर्याने म्हटले की, “नाव बदलणे ही एक नवीन संस्कृती आहे. नावे बदलण्याची घाई करतात, पण देखभालीच्या बाबतीत ते कधीही घाई करत नाहीत. रस्त्याचे नाव बरोबर आहे ना? एवढा मोठा फलक का? तुम्हाला वाटत नाही का की तो पादचाऱ्यांना त्रास देईल?” अशा शब्दांत त्यांनी फलकाच्या आकारावरही टीका केली.
एकंदरीत, कॅन्टोन्मेंट बोर्डाने ब्रिटिशकालीन रस्त्यांची नावे बदलून राष्ट्रवीरांचा सन्मान करण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण असला तरी, रस्त्यांच्या नामांतराच्या या ‘नवीन संस्कृतीने’ मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष होऊ नये, अशीच अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.


