बेळगाव लाईव्ह : कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडूराव यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) कार्यावर सडकून टीका केली आहे. बेळगावात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आरएसएस ही कोणतीही सामाजिक संस्था नसून, ती भाजपची उप-संस्था आहे. आरएसएस कोणत्याही प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवत नाही, तर ती थेट निवडणूक आणि सरकार स्थापनेसारख्या राजकीय गतिविधींमध्ये भाग घेते. त्यामुळे अन्य कोणत्याही गतिविधींमध्ये नसलेल्या या संस्थेवर बंदी घालणे चुकीचे नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.
मंत्री गुंडूराव यांनी यावेळी मंत्री प्रियांक खर्गे यांनी लिहिलेल्या पत्राचे जोरदार समर्थन केले. आरएसएसचा राजकारणाशी संबंध नाही, असे ती कितीही सांगत असली तरी, ती एक राजकीय संस्थाच आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे, ही संस्था निवडणूक, सरकार स्थापन करणे या सर्व राजकीय कामांमध्ये सक्रिय सहभागी होते.
या कारणांमुळे आरएसएस ही भाजपची उप-संस्था असल्याचे माझे मत आहे, असे त्यांनी नमूद केले. आरएसएसने आपल्या कार्यक्रमांसाठी, उपक्रमांसाठी सरकारी जागांचा उपयोग करू नये, तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी आरएसएसमध्ये कार्यरत राहू नये. अशा पद्धतीने कामकाज करणाऱ्या राजकीय संस्थेवर बंदी घालण्यात काहीही चूक नाही, असे ते स्पष्टपणे म्हणाले.
या राजकीय विधानांसोबतच, आरोग्य मंत्री गुंडूराव यांनी बेळगावमधील आरोग्य आणि विकासकामांचा आढावा घेतला. ते म्हणाले की, गेल्या ५-६ महिन्यांपासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे विकास कामांची गती मंदावली होती, मात्र आता पाऊस कमी झाल्याने सरकारकडून ही कामे लवकरच हाती घेतली जातील.
अधिकाऱ्यांची बैठक घेऊन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. बेळगाव येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नागरिकांची वाढती गर्दी विचारात घेऊन, लवकरच पुरेसे कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाईल. तसेच, अधिकाऱ्यांच्या समन्वयाच्या कमतरतेबद्दल तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी आज बेळगावमध्ये दिली.


