बेळगाव लाईव्ह : लोंढा -गोवा राज्याच्या सीमेवरील मोले येथील वाहन तपासणी नाका काल मंगळवारी मध्यरात्री पासून अधिकृतरीत्या सुरू झाला आहे. या नाक्यांवर कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतून येणाऱ्या वाहनांची तपासणी होणार आहे.
मोले येथे आजपासून तंत्रज्ञानावर आधारित तपासणी नाके सुरू केले आहेत. पोलिस खात्याकडून चालवल्या जाणाऱ्या या तपासणी नाक्यासाठी तंत्रज्ञान गोवा माहिती तंत्रज्ञान खात्याने पुरवले आहे. या नाक्यावर कर्नाटक, महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यांतून येणाऱ्या वाहनांची तपासणी होणार आहे.
वाहनांच्या क्रमांकावरून कागदपत्राची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये एखाद्या वाहनाचा विमा अथवा वाहनांची वयोमर्यादा संपल्यास त्यांना गोव्यात प्रवेश मिळणार नाही. त्यांना माघारी पाठवण्यात येणार आहे. याचबरोबर इतर कागदपत्रे योग्य नसल्यास त्यासंबंधी त्यांना टोलनाक्यावर दंड भरून गोव्यात प्रवेश करावा लागणार आहे.

याची सुरुवात २२ सप्टेंबरपासून होणार होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे मंगळवारी मध्यरात्रीपासून याची सुरुवात झाली आहे. सुरुवातीला एक महिना नाक्यावरच दंड आकारण्यात येणार आहे, त्यानंतर कागदपत्रे नसलेल्या वाहनांना ऑनलाइन दंड भरावा लागणार आहे. एखाद्या वाहनाकडे प्रदूषण न करणारे वाहन असे प्रमाणपत्र नसल्यास दहा हजार रुपयांचा दंडही भरावा लागणार आहे.



