बेळगाव लाईव्ह : दिवाळीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘स्नेह आणि प्रकाश’ अभियानाचा चौथा दिवस भाऊबीजेच्या पवित्र मुहूर्तावर उत्साहात साजरा झाला. फेसबुक फ्रेंड्स सर्कल आणि रेनबो कलेक्शन, शहापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या उपक्रमांतर्गत कँटोन्मेंट बोर्डातील विविध विभागांतील ८० भगिनींना साड्यांची भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सफाई कर्मचारी, स्टाफ नर्स, स्टेनोग्राफर, सहायक शिक्षिका, आया, दाई, मुख्याध्यापिका, लॅब टेक्निशियन, मिडवाईफ, शिपाई, महसूल अधीक्षक आणि हाऊसकीपिंग स्टाफ अशा सर्व विभागांतील भगिनींचा यात समावेश होता. ही भेट केवळ वस्तू नसून, त्यांच्या समर्पणाला, धैर्याला आणि अमूल्य योगदानाला दिलेली कृतज्ञता आणि आदरांजली होती, असे संयोजकांनी सांगितले.
भाऊबीज हा सण भाऊ आणि बहिणीच्या पवित्र प्रेम आणि संरक्षणाचा बंध साजरा करतो. या दिवशी भगिनी भावांना टिळक लावून, आरती करतात व त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. अशा मंगलमय दिवशी सामुदायिक सेवेत रुजू असलेल्या भगिनींना ही भेट देऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यात आला.








यावेळी रेनबो कलेक्शनचे मालक सुनील धोंगडी, कँटोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सारस्वत, नामनिर्देशित बोर्ड सदस्य सुधीर तुप्पेकर, कँटोन्मेंट बोर्ड स्कूल आणि हॉस्पिटलचे ब्रँड अँम्बेसेडर संतोष दरेकर आणि अभियंता सतीश मन्नूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर यांनी आभार मानले.




