बेळगाव लाईव्ह :ऊसाला योग्य हमीभाव जाहीर करावा, तसेच बसुर्ते आणि अतिवाड गावांतील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेला नाही असा भरपाईचा प्रश्न निकाली काढावा, या मागणीसाठी कर्नाटक राज्य रायता संघ, हरित सेना आणि रयत कल्याण विकास संघटनेच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
रयत संघटनेच्या शेतकरी नेत्यांने सांगितले की बसुर्ते आणि अतिवाड गावातील शेतकऱ्यांना सरकारकडून अजूनही कोणतीही भरपाई मिळालेली नाही. मागील १४ वर्षांपासून या मागणीसाठी आंदोलन चालू आहे, मात्र शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे.
कर्नाटक राज्य रायता संघटनेने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी योग्य दर ठरवावा आणि बेळगावासह राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दर निश्चित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. महाराष्ट्रात जसा दर दिला जात आहे, तसाच दर कर्नाटकातही लागू करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
बसुर्ते आणि अतिवाड गावांमध्ये सरकारने ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित केली आहे, त्यांना तातडीने भरपाई देण्यात यावी, तसेच दोन्ही मागण्या तात्काळ मान्य कराव्यात, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
या आंदोलनात सुरेश परगण्णावर, राघवेंद्र नाईक, गणेश जावेद यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.




