बेळगाव लाईव्ह :राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबर नंतर सुरू करण्यात यावा असा आदेश सरकारने जारी केला असल्यामुळे बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या उसाचा दर 5500 रुपये इतका घोषित करावा, या मागणीसाठी येत्या शुक्रवार दि. 10 ऑक्टोबर 2025 रोजी हारुगिरी क्रॉस येथे कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेतर्फे आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती रयत संघटनेचे नेते प्रकाश नायक यांनी दिली.
बेळगाव शहरात आज बुधवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. नायक यांनी सांगितले की, बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील साखर कारखान्यांच्या अग्निपूजा करून उसाच्या गळीत हंगामाला सुरुवात होणार आहे.
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबर नंतर सुरू करण्यात यावा असा आदेश सरकारने जारी केला असला तरी अद्याप बेळगाव जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी उसाच्या दराची घोषणा केलेली नाही. उसाच्या रिकव्हरीच्या बाबतीत सरकार आणि कारखान्यांच्या मालकांकडून आत्तापर्यंत शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली आहे.
उसामध्ये साखर भरत नसल्यामुळे 1 नोव्हेंबरपर्यंत गळीत हंगाम सुरू केला जाऊ नये अशी शेतकऱ्यांची मागणी असते. कारण तसे झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. त्या अनुषंगाने राज्य व केंद्र सरकारचे परिपत्रक जारी केलेले असताना देखील साखर कारखान्याचे मालक आपला कारखाना लवकर सुरू करून शेतकऱ्यांना फसवण्याची कूटनीती अवलंबत असतात.
याची सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच कारखान्यांनी सर्वप्रथम उसाचा प्रति टन दर त्वरित जाहीर करावा अशी आमची मागणी आहे. यासाठी हारुगिरी येथे येत्या शुक्रवारी 10 ऑक्टोबर रोजी आंदोलन केले जाणार आहे. त्याचप्रमाणे आम्ही शेतकरी नेते, शेतकरी जवळपास 30 साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांसोबत बैठक करणार आहोत. या बैठकीस जिल्हाधिकाऱ्यांना देखील निमंत्रित करण्यात आले असून त्यांनी सरकारच्यावतीने ऊसदराची घोषणा करावी अशी आमची विनंती आहे.
त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या उसाच्या 9.5 रिकव्हरीला प्रति क्विंटल 4,700 रुपये आणि अबकारी वगैरे इतर कर असे 2 हजार रुपये मिळाला पाहिजेत, अशी आमची मागणी आहे, असे प्रकाश नायक यांनी स्पष्ट केले याप्रसंगी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


