बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरात मोकाट कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणावर वाढली असून, आता हि दहशत असह्य झाली आहे. मारुती नगर परिसरात घरातून बाहेर खेळत असलेल्या एक वर्ष १० महिन्यांच्या चिमुकलीला कुत्र्यांनी चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
बेळगावच्या मारुती नगरमधील पहिल्या क्रॉस रोडवर, घरासमोर खेळत बसलेल्या आराध्या उमेश तरगार (वय १ वर्ष १० महिने) या बालिकेवर मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला. कुत्र्यांनी झुंडीने येऊन चावा घेतल्यामुळे आराध्याच्या चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या आहेत. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या घटनेनंतर बालिकेचे काका महेश यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “महानगरपालिकेला वारंवार माहिती देऊनही कोणतीही योग्य कारवाई केली जात नाहीये. ही कुत्री लहान-मोठ्या सर्वांवर हल्ले करत आहेत आणि वाहनांच्याही मागे लागतात. आता आम्ही महानगरपालिकेच्या विरोधातच गुन्हा दाखल करू.” असा इशारा त्यांनी दिला.
स्थानिक नागरिकांनीही आपला असंतोष व्यक्त करत “दिवस-रात्र न पाहता मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. ती टोळक्याने येऊन लोकांवर हल्ला करत आहेत. अनेक वेळा महानगरपालिकेच्या निदर्शनास आणूनही काहीच कारवाई झाली नाही. या महिन्यातील ही पाचवी घटना आहे,” असे त्यांनी सांगितले. नागरिकांनी तात्काळ महानगरपालिकेने मोकाट कुत्र्यांचा उपद्रव थांबवावा, अशी मागणी केली आहे.
शहर, उपनगरांसह तालुक्यातील विविध भागातूनही मोकाट कुत्र्यांची संख्या लक्षणीय रित्या वाढली आहे. शिवाय कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात प्रशासन अपयशी ठरत असून ज्या ज्या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत त्या त्या ठिकाणी कुत्र्यांची संख्या अधिक प्रमाणात दिसून येत असून मोकाट कुत्र्यांकडून हल्ले होण्याचे प्रकारही वाढत चालले आहेत.
मोकाट कुत्र्यांच्या सततच्या हल्ल्यांमुळे बेळगावात निर्माण झालेली ही भीतीची परिस्थिती पाहता, महानगरपालिका प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे. वारंवार होणाऱ्या अशा घटनांमुळे मोकाट कुत्र्यांची दहशत वाढत असून प्रशासनाच्या दुर्लक्षपणावर नागरिक तीव्र ताशेरे ओढत आहेत.


