बेळगाव लाईव्ह : बेळगावच्या प्रतिष्ठेच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी जारकीहोळी आणि हेब्बाळकर कुटुंबाने एकत्र येत मोठे शक्तीप्रदर्शन केले. या पार्श्वभूमीवर आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत अत्यंत महत्त्वाचे आणि स्पष्ट वक्तव्य केले. ते म्हणाले की, डीसीसी बँकेच्या उन्नतीत लिंगायत समाजाचा वाटा अमूल्य असून, बँकेचे अध्यक्षपद हे लिंगायत समाजाकडेच राहील.
कुटुंबशाहीच्या राजकारणाबद्दल विचारलेल्या प्रश्नावर भालचंद्र जारकीहोळी यांनी सडेतोड उत्तर दिले. ते म्हणाले, “कुटुंबशाहीचे राजकारण फक्त आमच्या कुटुंबातच नाही. जिल्ह्याच्या आणि देशाच्या इतिहासाची पाने उलटून पाहा. डीसीसी बँकेच्या निवडणुकीत जारकीहोळी कुटुंबातील युवा नेत्यांनी प्रवेश केला म्हणून कोणताही फरक पडणार नाही.”
अर्ज भरण्याच्या निमित्ताने आज जारकीहोळी कुटुंबातील दोन युवा नेते रिंगणात उतरले. बेळगाव तालुका संचालकपदासाठी राहुल जारकीहोळी, तर गोकाक तालुका संचालकपदासाठी अमरनाथ जारकीहोळी यांनी अर्ज दाखल केले. त्यांच्यासोबत मुडलगि तालुक्यातून नीळकंठ कप्पलगुद्दी, तर अन्य संचालकपदासाठी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांनीही अर्ज भरला. राहुल आणि अमरनाथ यांना त्यांचे काका आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी सक्रिय पाठिंबा दिला.
भालचंद्र जारकीहोळी यांनी नंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “सहा लोक इच्छुक असतानाही आम्ही समन्वय साधला आणि चन्नराज हट्टीहोळी यांना अन्य मतदारसंघातून उमेदवारी दिली. सर्वांच्या आशीर्वादाने आमचा पॅनल सत्तेत येईल.” बिनविरोध होणाऱ्या ठिकाणीही काहीजण विनाकारण निवडणूक लढवत आहेत, पण कोणीही रिंगणात उतरले तरी विजय आमचाच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भालचंद्र जारकीहोळी यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.



