बेळगाव लाईव्ह : कर्नाटक राज्योत्सवाच्या दिवशी ‘काळा दिन’ पाळण्यास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे. राज्योत्सवाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
जिल्हाधिकारी रोशन यांनी बैठकीत ठणकावून सांगितले की, महाराष्ट्र एकीकरण समितीला राज्योत्सव दिनी कोणत्याही प्रकारचा ‘काळा दिन’ पाळण्यास परवानगी दिली जाणार नाही.
या निर्णयामागची भूमिका स्पष्ट करताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कर्नाटक राज्योत्सव हा सलोखा, ऐक्य आणि सकारात्मकतेचा दिवस आहे. या शुभदिनी कोणत्याही राज्यविरोधी उपक्रमाला प्रशासनाकडून स्थान दिले जाणार नाही.
राज्योत्सव शांततेत आणि उत्साहात पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पाऊले उचलली जात आहेत. लवकरच कर्नाटक संबंधित संघटना आणि जिल्हा प्रशासन यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक घेऊन उत्सवाच्या शांततापूर्ण आयोजनासाठी रूपरेषा निश्चित केली जाईल, अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी राज्योत्सव दिन आनंद, ऐक्य आणि सकारात्मकतेने साजरा करावा. या काळात कोणत्याही प्रकारची वादग्रस्त हालचाल किंवा कृती आढळल्यास, संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशाराही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिला आहे.
जिल्हा पंचायतीच्या सभागृहात आयोजित या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख भीमाशंकर गुळेद यांच्यासह पोलीस खात्याचे अधिकारी आणि कन्नड संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.



