बेळगाव लाईव्ह :दसरा आणि आजच्या खंडेनवमीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे शहरातील बाजारपेठा सध्या गजबजल्या आहेत. ऊस, फुले, फळे यांची विक्री आज तेजीत सुरू असून खरेदीसाठी सर्वत्र उत्साही वातावरण पहावयास मिळत आहे.
खंडेनवमीच्या निमित्ताने आज बुधवारी घराघरांमध्ये शस्त्र पूजन केले जाते. आज व्यावसायिक आपापल्या व्यवसायातील साहित्यांचे तर शेतकरी शेतोपयोगी साधनसामग्री व हत्यारांचे पूजन करतात वाहनधारकांकडून वाहनांची पूजा केली जाते.
खंडे नवमीच्या पूजा विधींसाठी ऊस झेंडूची फुले नारळ धूप अगरबत्ती शमीची अर्थात आपट्याची पाने, पुष्पहार, केळीची झाडे यांची मोठ्या प्रमाणात मागणी असते. सध्या शहरातील गणपत गल्ली, समादेवी गल्ली, पांगुळ गल्ली, नरगुंदकर भावे चौक, काकतीवेस आदी ठिकाणांसह उपनगरांमध्ये ठीकठिकाणी ऊस, फुले, फळे, आपट्याची पाने यांची विक्री जोरात सुरू आहे.
झेंडूच्या हाराची 70 ते 60 रुपये, तर उसाची 100 रुपयाला पाच अशा दराने विक्री होत आहे. बाजारात ऊस मोठ्या प्रमाणात दाखल झाला असून त्याच्या खरेदीसाठी कांही ठिकाणी ग्राहकांची झुंबड उडाली होती.
आज सकाळपासून पावसाने उघडी दिल्यामुळे शहरवासीयांमधील उत्साह वाढला असून खरेदीसाठी बाजारपेठ नागरिकांनी फुलून गेल्याचे पहावयास मिळत आहे.


