बेळगाव लाईव्ह :पावसामुळे नष्ट झालेल्या पिकांची नुकसान भरपाई देण्याबरोबरच ऊसाला योग्य हमीभाव देण्याची घोषणा करावी, या शेतकऱ्यांच्या मागणीकडे आज शनिवारी सकाळी कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरु सेनेने जोरदार निदर्शने करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे लक्ष वेधून घेतले.
बेळगाव विमानतळावरून स्मार्ट सिटी अंतर्गत निर्मित नवे बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे उद्घाटन करून बीम्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्यात जाणारे मुख्यमंत्री सिद्धरामय्या शेतकरी करत असलेल्या निदर्शनाच्या ठिकाणी आपली कारगाडी कांही क्षण थांबून कार मधूनच शेतकऱ्यांना हात हलवून दाखवत पुढे मार्गस्थ झाले.
अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष करून कडधान्य संपूर्ण नष्ट झाले आहे. परिणामी शेतकरी मोठ्या त्रासात, संकटामध्ये सापडला आहे. पावसामुळे बेळगावसह उत्तर कर्नाटकातील सोयाबीन, बटाटा, मका, जोंधळा, ऊस वगैरे पिकांची मोठी हानी झाली आहे.
यासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर 40 हजार रुपये नुकसान भरपाई दिली जावी. बँका आणि फायनान्स कंपनीचा त्रास, लिलाव प्रक्रिया अमानवी झाल्या आहेत.
तसेच शेतकऱ्यांचे सतत नुकसान होत असल्यामुळे केंद्र व राज्य सरकारने त्यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.


