बेळगाव लाईव्ह :बेळगाव महानगरपालिकेतील नगरसेवक पुन्हा एकदा अभ्यास दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत. यावेळी ते इंदूर येथे जाणार असून दिवाळी सणानंतर लवकरच होणारा हा दौरा इंदूरच्या यशस्वी स्वच्छता मॉडेल आणि घनकचरा व्यवस्थापन प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी आहे.
गेल्या जानेवारीमध्ये चंदीगडला भेट देणाऱ्या बेळगावच्या नगरसेवकांसाठी हा वर्षातील दुसरा अभ्यास दौरा असेल. आरोग्य विभागाकडून या आगामी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून ज्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 60 लाख रुपयांचे बजेट वाटप करण्यात आले आहे.
हा निधी आधीच मंजूर झाला झाला असल्यामुळे त्यासाठी राज्य सरकारकडून स्वतंत्र मंजुरीची आवश्यकता नसल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. नगरसेवकांचे शिष्टमंडळ येत्या 26 ऑक्टोबर रोजी इंदूरला रवाना होण्याची अपेक्षा आहे. चंदीगड दौऱ्याचे यशस्वी म्हणून कौतुक केले जात असले तरी, गेल्या 9 महिन्यांत बेळगावमध्ये तिथून शिकलेल्या कोणत्याही धड्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे नागरिकांनी निदर्शनास आणून दिले आहे.
मागील अभ्यास दौऱ्यांमधूनही फारसे ठोस परिणाम दिसून आलेले नाहीत. आता आगामी इंदूर अभ्यास दौऱ्यातून बेळगावची स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यासाठी ठोस कृती करण्यास प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.
नगरसेवकांच्या इंदूर दौऱ्याचा अंतिम प्रवास कार्यक्रम तयार केला जात आहे. ही प्रवास व्यवस्था चंदीगड दौऱ्याप्रमाणेच राज्य सरकारच्या एजन्सी एमएसआयएलद्वारे व्यवस्थापित केली जाईल. यापूर्वी नगरसेवकांचे अभ्यास दौरे चंदीगड, शिमला, पणजी आणि पुणे येथे आयोजित केले गेले आहेत.
गेल्या वर्षी, श्रीशैल कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य स्थायी समितीसाठी स्वतंत्र इंदूर दौरा प्रस्तावित करण्यात आला होता, जे या कल्पनेबाबत विशेष उत्सुक होते.





