बेळगाव लाईव्ह : बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात असलेल्या बंबळवाड गावात पतीच्या क्रूरतेचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पतीच्या अनैतिक संबंधांवर प्रश्न विचारल्याने, पतीने पत्नीसह तिच्या माहेरच्या कुटुंबियांवर जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, पती राकेश याचे एका मुस्लिम युवतीसोबत अनैतिक संबंध होते. पत्नी राजश्री याबद्दल त्याला सातत्याने विचारणा करत होती. याच कारणामुळे, राकेश आणि त्याच्या कुटुंबीयांनी क्रूरतेचा कळस गाठला.
दीपावलीच्या पूजेसाठी बोलावून पत्नीची फसवणूक करत, पती राकेश आणि त्याच्या नातेवाईकांनी पत्नी राजश्री आणि तिच्या आईला बेदम मारहाण केली. पती आणि त्याच्या साथीदारांनी तिला छाती, मान आणि डोक्यावर हल्ला करत गंभीर जखमी केल्याचा आरोप पीडित पत्नी राजश्री हिने केला आहे.
यापूर्वीही पतीच्या अनैतिक संबंधांमुळे पत्नी राजश्रीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, पती सुधारेल या आशेने आणि वडीलधाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन ती संसार करत होती. पतीच्या या हल्ल्यात पत्नी आणि तिची आई गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांना तातडीने गोकाक येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ही संपूर्ण घटना चिकोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून, पोलिसांनी याप्रकरणी पती राकेशसह त्याच्या नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






