बेळगाव लाईव्ह :कॅम्प, बेळगाव येथील खाचखळगे पडून अत्यंत दुर्दशा झालेल्या कॅटल रोड व हॅवलॉक रोड या सर्वाधिक वर्दळीच्या रस्त्यांची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक रहिवाशांसह वाहन चालकांकडून केली जात आहे.
कॅम्प येथील सर्वाधिक वर्दळीच्या कॅटल रोड व हॅवलॉक रोडची सध्या पार दुर्दशा झाली आहे. जागोजागी लहान-मोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहन चालकांना रस्त्यावरून जाताना कसरत करावी लागत आहे. कॅम्प पोलीस ठाण्यासमोरहून जाणाऱ्या कॅटल रोडवर वाहनांची नेहमी वर्दळ असते.
महाराष्ट्रात जाणाऱ्या बसेसही याच मार्गावरून धावत असतात. त्याशिवाय कार, टेम्पोंसह अवजड वाहने खानापूरला जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करतात. पाऊस आणि वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे अलीकडे या रस्त्याची वाताहत झाली आहे. पावसामुळे या रस्त्यावर लहान -मोठे खड्डे पडले असल्यामुळे वाहन चालकांना विशेष करून दुचाकी वाहन चालकांना या रस्त्यावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
परवा सिमोल्लंघना दिवशी देखील श्री दुर्गामाता देवीची मिरवणूक नेताना भक्तांना या खराब रस्त्याचा मोठा त्रास सहन करावा लागला होता. कॅम्प परिसरातील तीन रस्ते आमदार फंडातून मंजूर झाले असल्याचे कळते. मात्र प्रत्यक्षात अजूनही एकाही रस्त्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. दुसरीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे विकास कामे राबविण्यासाठी निधीची कमतरता असल्याने कॅम्प परिसरातील रस्ते विकासाच्या प्रतीक्षेत असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगावचे माजी उपाध्यक्ष साजिद शेख यांनीही कॅम्प परिसरातील कॅटल रोड व हॅवलॉक रोड या रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली असल्याचे सांगितले. तथापि ही बाब आमदार असिफ (राजू) सेठ यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली आहे. आमदारांनी देखील आपल्या आमदार फंडातून हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी पुरेसा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच या रस्त्यांचे काम हाती घेऊन ते सुव्यवस्थित केले जातील, असे शेख यांनी स्पष्ट केले.


