बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर कॅम्प पोलिसांनी दोन स्वतंत्र कारवाया करत अंमली पदार्थ विक्री आणि जुगार खेळणाऱ्या एकूण सहा आरोपींना अटक केली आहे.
. आरोपी अप्पर मुन्ना धारवाडकर (वय २६, रा. उज्वल नगर, बेळगाव) आणि सलीम खलील हुबळी (वय २६, रा. शिवाजी नगर, बेळगाव) हे दोघे बेळगावच्या अंबा भवन हॉटेलच्या मागील सार्वजनिक ठिकाणी हेरॉईनची विक्री करत होते.
त्यावेळी पीएसआय मंजुनाथ भजंत्री (सीसीबी विभाग) आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी छापा टाकून आरोपींना पकडले. त्यांच्याकडून अंदाजे ३७,२०० रुपये किमतीचे २०.२६ ग्रॅम हेरॉईन, २,००० रुपये किमतीचा सॅमसंग मोबाईल आणि १,०७० रुपये रोख रक्कम, असा एकूण ४०,२७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींनी हे हेरॉईन मुंबईतील सायन कोळवाडा येथील रहिवासी अम्मा उर्फ राणी एम. नावाच्या महिलेकडून खरेदी केल्याची माहिती दिली. त्यानुसार तिघांविरुद्ध कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे.
दुसऱ्या कारवाईत, पीएसआय रुक्मिणी ए. आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बेळगावच्या हाजीपीर रस्त्यावरील सार्वजनिक ठिकाणी छापा टाकला. त्यावेळी जुगार खेळणाऱ्या मंगेश बाबू दवळे, राम देवनाथ लाखे, युवराज सुंदर लाखे (सर्व रा. शिवाजी नगर, बेळगाव) आणि अजय अर्जुन लाखे (रा. ज्योती नगर, गणेशपूर, बेळगाव) आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
यावेळी आरोपींकडून १,६८० रुपये रोख रक्कम आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.. आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
या दोन्ही प्रकरणांमध्ये एकूण ०६ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, ३७,२०० रुपये किमतीचे २०.२६ ग्रॅम हेरॉईन, १ सॅमसंग मोबाईल, एकूण २,७५० रुपये रोख रक्कम (दोन्ही प्रकरणांतील), आणि जुगाराचे पत्ते, असा एकूण ४१,९५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई करणाऱ्या पीएसआय आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कार्याची प्रशंसा बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी केली आहे.











