बेळगाव लाईव्ह : “आई हेच दैवत, आणि तिचं आयुष्य हेच प्रेरणागीत!” या उदात्त भावनेतून राकसकोप येथे मातोश्री सावित्री रुक्माण्णा मोरे यांचा ९४ वा वाढदिवस आणि शताब्दी महोत्सव अत्यंत भक्तिमय व संस्कारपूर्ण वातावरणात नुकताच साजरा करण्यात आला. या सोहळ्याला ‘ग्रंथतुला’ या अनोख्या संकल्पनेची जोड देण्यात आली होती, ज्यामुळे या कार्यक्रमाला एक वेगळी वैचारिक उंची मिळाली.
या प्रसंगी धन्वंतरी यज्ञ, सत्यनारायण पूजा आणि धान्यतुला यांसारख्या पारंपरिक विधींसोबतच ‘ग्रंथतुला’ या शास्त्रोक्त विधीचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण मोरे परिवारासह आप्तेष्ट आणि गावातील मान्यवर यांच्या उपस्थितीत कृतज्ञता, आनंद आणि मातृत्वाच्या भावनेने संपूर्ण वातावरण ओथंबून गेले होते. या कौटुंबिक सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे, मामा, मावशी, मुले, सुना, नातवंडे आणि पणतवंडे अशा चारही पिढ्यांची एकत्र उपस्थिती होती. या कुटुंबबंधांच्या सुवासिक क्षणांनी परंपरा आणि संस्कारांची साखळी अधिक तेजाने उजळली. ग्रंथतुला करून ग्रंथांमधील विचारांचे दान करण्याचा संदेश या वेळी देण्यात आला.
हा सोहळा पहिल्यांदाच राकसकोप येथे शिवसंत संजय मोरे (संचालक, यश ॲटो शोरूम, बेळगाव), रामचंद्र मोरे, अरुण मोरे आणि सौ. मंजुळा ढेगसकर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

या ‘मातृ संस्कारा’च्या सोहळ्याला समाजात आदर्शवत मानले जात आहे. आयोजक शिवसंत संजय मोरे यांनी यावेळी वृद्धाश्रमांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करत म्हटले की, “जगातल्या प्रत्येक यशाचं मूळ आईच्या आशीर्वादातच आहे!”
ग्रंथतुलेतून ज्ञानदान: या सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ‘ग्रंथतुले’साठी वापरण्यात आलेले सर्व ग्रंथ स्थानिक प्राथमिक व हायस्कूल शाळांना भेट देण्यात आले. यातून वाचनसंस्कृतीला चालना मिळेल, तसेच ज्ञानसंस्कारांची बीजे समाजात रोवली जातील, असा संदेश देण्यात आला.
याप्रसंगी उद्योगपती महादेव चौगुले, ईश्वर लगाडे, ॲड. सुधीर चव्हाण, रणजित चौगुले, मीनाक्षी तोडकर (धारवाड), ज्योती जाधव (पुणे) आणि रिलस्टार मानसी पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमाकवी रवींद्र पाटील यांनी केले. हा चार पिढ्यांच्या साक्षीने साजरा झालेला ‘ग्रंथतुला’ सोहळा मातृत्व, संस्कार आणि साहित्यातील सोन्याचा अध्याय ठरला.




