बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासून बेळगावात सुरू होणार असल्याची घोषणा विधानसभा अध्यक्षांनी केली आहे. या निर्णयानंतर दरवर्षीप्रमाणे यंदाही शहरातील सर्व हॉटेल्स अधिवेशनासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत.
७ डिसेंबरपासून सर्व विद्यमान हॉटेल बुकिंग्ज आपोआप रद्द होणारअसून, सामान्य नागरिक, लग्न समारंभ आयोजक आणि पर्यटक यांच्यासमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून त्यांना पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.बेळगावातील हिवाळी अधिवेशन साधारणपणे १० दिवस चालतं, त्यामुळे १८ डिसेंबरपर्यंत सर्व हॉटेल्स पूर्णपणे सरकारी वापरात राहणार आहेत. या काळात जर कोणी लग्न, कौटुंबिक कार्यक्रम किंवा इतर सोहळ्यांचे नियोजन केले असेल, तर लवकरात लवकर होमस्टे किंवा पर्यायी निवासाची व्यवस्था करावी, असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं आहे.
जिल्हा प्रशासन दरवर्षीप्रमाणे हॉटेल मालकांशी अधिकृत पत्रव्यवहार करून खोल्या आरक्षित करतं. आमदार, अधिकारी, पत्रकार आणि सुरक्षा दलांसाठी निवासाची सोय केली जाते. यासाठी हॉटेल्सना शासनमान्य दरानुसार मोबदला दिला जातो.
बेळगावमध्ये दरवर्षी अधिवेशनाच्या काळात संपूर्ण शहरात सरकारी हालचालींना वेग येतो, मात्र स्थानिक नागरिक व पाहुण्यांना निवासाच्या अडचणींना सामोरं जावं लागतंहा अनुभव आहे जोवर बेळगावात आमदारांच्या अधिकाऱ्यांच्या निवासासाठी हॉस्टेल किंवा इमारत बांधली जात नाही तोवर सामान्य माणसाला यांचा त्रास होणारच आहे.
म्हणूनच, या वर्षी ७ ते १८ डिसेंबर दरम्यान बेलगावात कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्यांनी पर्यायी निवासाची तयारी आताच करून ठेवावी!




