बेळगाव लाईव्ह : यरगट्टी तालुक्यातील माडमगेरी येथे पंचायत विकास अधिकारी (पी.डी.ओ.) यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ कर्नाटक राज्य पंचायत विकास अधिकारी कल्याणकारी संघटनेने आज राज्यव्यापी तीव्र आंदोलन पुकारले. बेळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
यावेळी हल्ला करणाऱ्यांवर त्वरित व कठोर कारवाई व्हावी, तसेच पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी राज्यात स्वतंत्र विशेष कायदा लागू व्हावा, या प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला सादर करण्यात आले.
या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करताना संघटनेचे प्रतिनिधी आनंद होळेन्नवर यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली. ते म्हणाले, “यरगट्टी तालुक्यातील माडमगेरी येथील पी.डी.ओ. जयगौडा पाटील यांच्यावर ७ ते ८ जणांनी मिळून हल्ला केला.
मात्र, त्यापैकी केवळ ४ जणांवरच गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.” यापूर्वी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊनही कारवाई न झाल्याने ग्राम पातळीवर अशा घटना दडपल्या जात आहेत, असे त्यांनी नमूद केले. पी.डी.ओ.वर होणाऱ्या हल्ल्यांमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आनंद होळेन्नवर यांनी शासनाकडे मागणी केली की, “पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी तातडीने विशेष कायदा लागू करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यात सुधारणा करावी.” यावेळी शिवकांत सी.एम., लीला मेत्री, आशा.एच.जी., प्रतिभा मुतालिक देसाई, उस्मान नदाफ यांच्यासह अनेक पंचायत विकास अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



