बेळगाव लाईव्ह ; खानापूर तालुक्यातील जांबोटी भागातील बैलूर, बाकनूर, मोरब आणि देवाचीहट्टी या चार गावांच्या एकत्रित सहभागातून होणारी बैलूर महालक्ष्मी यात्रा येत्या वर्षी 6 मे ते 15 मे 2026 या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
या यात्रेचे आयोजन यापूर्वी 11 मे 2011 रोजी करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल पंधरा वर्षांनंतर पुन्हा एकदा महालक्ष्मी यात्रेचे आयोजन करण्याचा ऐतिहासिक निर्णय चारही गावांच्या भोमाणदार आणि पंचांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
निर्णयानंतर परंपरेनुसार पालव्यांची विधिवत पूजा करून त्यांना गावामध्ये सोडण्यात आले आहे. तसेच देवीचे पाच वार पाळण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
परंपरेनुसार बैलूर गावची महालक्ष्मी ही देवाचीहट्टी येथील कुंभार घराण्यातील कन्या मानली जाते. तिला बसण्याचे आसन बाकनूर ग्रामस्थ करतात आणि तेच ग्रामस्थ देवीला गाड्यावरून उचलून बैलूरवासीयांकडे सुपूर्द करतात. त्यानंतर वाजतगाजत बैलूर येथे देवीचा विवाह सोहळा पार पडतो.
यानंतर मोरब ग्रामस्थांवर देवीच्या पर्णकुटीची जबाबदारी येते. नऊ दिवसांनी देवीचे प्रयाण मोरब येथे होत असून, तेथील ग्रामस्थ गवताची पर्णकुटी बांधून परंपरेप्रमाणे आपले कर्तव्य पार पाडतात, ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे.
दरम्यान, यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून रस्त्यांची दुरुस्ती, बससेवा वाढविणे, तसेच वीज व पाणीपुरवठा सुधारावा अशा मागण्या शासन दरबारी करण्यात आल्या आहेत. बैलूरला बाकनूर आणि देवाचीहट्टी गावांना जोडणारे रस्ते अत्यंत जीर्ण अवस्थेत आहेत. महालक्ष्मी यात्रेदरम्यान भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने हे रस्ते तातडीने नव्याने तयार करण्यात यावेत, अशी मागणी सर्वत्र होत आहे.
सदर यात्रा धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक एकतेचे प्रतीक असून, चारही गावांमध्ये सध्या यात्रेची जोरदार तयारी सुरू झाली आहे.


