बेळगाव लाईव्ह : रुग्णसेवेत अल्पावधीतच आपले नाव कमावलेले अरिहंत हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर आता वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातही पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाले आहे. राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसकडून अलाईड कोर्सेस, डीएमएलटी (DMLT) व फिजिओथेरपी कोर्सेसना मान्यता मिळाली आहे. यामुळे लवकरच अरिहंत हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून अलाईड हेल्थ सायन्सेस व फिजिओथेरपीचे शिक्षण देण्यात येणार आहे. कणबर्गी रस्त्यावरील रामतीर्थ नगर येथील दयानंद आर्केडमध्ये हे महाविद्यालय सुरू करण्यात येणार असून, प्रवेशासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, अशी माहिती हॉस्पिटलचे एमडी व सीईओ डॉ. एम. डी. दीक्षित यांनी दिली.
अलाईड कोर्सेसमध्ये कार्डियाक केअर ट्रिटमेंट (ईको टेक्निशियन), ओटी ॲण्ड ॲनेस्थेशिया, आणि डीएमएलटी (लॅबोरेटरी टेक्निशियन) यांचा समावेश आहे. कार्डियाक केअर ट्रिटमेंट व ॲनेस्थेशिया आदींसाठी प्रत्येकी २० जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. यासोबतच, नर्सिंग कोर्सेसही सुरू करण्यात येणार असून त्यासाठी ६० जागा मंजूर झाल्या आहेत. फिजिओथेरपीसाठी ४० जागा मंजूर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी उच्चशिक्षित प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येत असून अनुभवी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती होणार आहे, असेही दीक्षित म्हणाले.
कणबर्गी रस्त्यावरील ऑटोनगर येथील दयानंद आर्केडमध्ये असलेल्या महाविद्यालयात अत्याधुनिक स्मार्ट क्लासरुम्स तयार करण्यात आले असून विद्यार्थ्यांना स्टँडर्ड आणि डिजिटल लायब्ररीची सुविधा देण्यात येणार आहे. तसेच, उच्च दर्जाची क्लिनिकल लॅबोरेटरी तयार करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी कॉलेज ते हॉस्पिटलपर्यंत बसची सुविधा पुरविण्यात येणार आहे. माफक दरात शिक्षण देण्यात येणार असल्याने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे.
त्याचबरोबर, हॉस्पिटलमध्ये डीएनबी, सीव्हीटीएस व कार्डिओलॉजी कोर्सेस सुरू करण्यात आले असून, या क्षेत्रात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना योग्य दर्जाचे शिक्षण दिले जात आहे. अरिहंत हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने वैद्यकीय शिक्षणात क्रांती घडवून आणण्यासाठी ही पावले उचलण्यात येत आहेत. भविष्यात विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. अल्पावधीतच रुग्णसेवेत यशस्वी घोडदौड करणारे अरिहंत हॉस्पिटल आता वैद्यकीय शिक्षणातही भरारी घेण्याच्या तयारीत आहे.
“वैद्यकीय क्षेत्रात परदेशात खूप संधी आहेत, यामुळे भारतातील ६० टक्के लोक वैद्यकीय क्षेत्रात परदेशात कार्यरत आहेत. ते भारतात अनुभव घेऊन परदेशात सेवा देत आहेत. यामुळे आपल्या देशातील मुलांना विशेषतः वैद्यकीय क्षेत्रात उज्ज्वल भविष्य करू इच्छिणाऱ्या मुलांना आपल्याच देशात सेवा बजावण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने अरिहंत हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे. याचा निश्चितच मुलांना लाभ होईल,” असे त्यांनी म्हटले.
वैद्यकीय क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना रुग्णसेवेची संधी मिळते. या संधीचे सोने करून ते आपल्या पायावर भक्कमपणे उभे राहू शकतात, प्रसंगी परदेशातही करिअर करू शकतात. आजकाल अनेक आजारांनी नागरिकांना ग्रासले आहे, यामुळे वैद्यकीय क्षेत्राचे महत्त्व वाढले आहे. “यामुळे आपणही आपल्या मायभूमीतील मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या उद्देशाने अनेक मेडिकल कोर्सेस सुरू करत आहोत. आमच्या संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या मुलांना सर्वोत्कृष्ट शिक्षण देण्यासाठी आम्ही सदैव वचनबद्ध राहणार आहोत,” अशा शब्दांत त्यांनी आपला उद्देश स्पष्ट केला.
अरिहंत हॉस्पिटलची स्थापना होऊन केवळ तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे. या काळात हजारो रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, रुग्णांवर उपचार केले जात आहेत. हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजी, कार्डियाक सर्जरी, लहान मुलांवरील हृदय शस्त्रक्रिया, गॅस्ट्रो, न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, जनरल मेडिसिन, ऑर्थोपेडिक, युरोलॉजी, नेफ्रालॉजी, जनरल सर्जरी आदी विभाग कार्यरत असून २४x७ (२४ तास व सातही दिवस) सुविधा उपलब्ध आहे. उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवेबरोबरच अत्याधुनिक लॅबोरेटरी, सिटी स्कॅन, सोनोग्राफी सुविधा असून सरकारी व खासगी इन्शुरन्सची सुविधाही उपलब्ध आहे.



