बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील कोल्हापूर सर्कलजवळ आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एक वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाली. रस्ता ओलांडत असताना बिम्सच्या दिशेने भरधाव वेगाने आलेल्या एका वाहनाने त्यांना धडक दिली, ज्यामुळे त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील उपलब्ध झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच उत्तर वाहतूक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
स्थानिक वाहतूक व्यवस्था आणि पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्हया अपघातामुळे कोल्हापूर सर्कलजवळील वाहतूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी आणि स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष पुन्हा एकदा समोर आले आहे. स्थानिक नागरिकांनुसार, या सर्कलवरील सिग्नल वारंवार बिघडलेले असतात, अचानक काही वेळासाठी बंद देखील झालेले असतात.
तसेच सिग्नल सुरू होण्याची वाट न पाहता अनेक वाहनचालक पुढे निघून जाण्याची घाई करतात. कोल्हापूर सर्कलसाठी स्वतंत्र वाहतूक पोलीस नियुक्त केलेले असतानाही अनेकदा वाहतुकीची समस्या उद्भवल्यास हे पोलीस केवळ ‘बघ्याची’ भूमिका घेतात, असा आरोप नागरिक करत आहेत.
अनेक पोलीस कर्मचारी त्यांच्या कर्तव्याच्या ठिकाणी किंवा पोलीस आसन व्यवस्थेऐवजी झाडाखाली वेळ घालवताना किंवा मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येतात. याशिवाय, गेल्या सहा महिन्यांपासून विविध कारणास्तव या ठिकाणी रस्त्याचे खोदकाम सुरू असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो आहे.
रस्त्यावर मोठ्या संख्येने असलेल्या फिरत्या विक्रेत्यांमुळे देखील वाहतूक विस्कळीत होते, ज्यामुळे रहदारीत अडथळा होतो आणि अपघातांची शक्यता बळावते. या दुर्घटनेनंतर येथील रहदारी पोलिसांनी चोख कर्तव्य बजावावे अशी भावना नागरीकातून व्यक्त होत आहे.





