बेळगाव लाईव्ह :बेळगावातील नार्वेकर गल्ली येथे घरामध्ये घडलेल्या आगीच्या दुर्घटनेत 78 वर्षीय सुप्रिया बैलूर या एकट्या राहणाऱ्या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी रात्री घडली.
सुप्रिया बैलूर या काल बुधवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घरात स्वयंपाक करत असताना अचानक आग लागून झपाट्याने घरात पसरली.
परिणामी फर्निचरसह घरातील सामान जळून खाक झाले. स्थानिकांनी अग्निशमन दल आणि पोलिसांना माहिती देताच त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात यश मिळवले.



तसेच भाजून गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत घरात अडकलेल्या सुप्रिया बैलूर यांना बाहेर काढून तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
तथापि दुर्दैवाने उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याचा कयास आहे.


