बेळगाव लाईव्ह : शहरातील रामदेव गल्ली परिसरात गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेली एक स्वागत कमान आज दुपारी अचानक कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
सध्या श्री गणेश दर्शनासाठी बेळगावसह परगावातील, परजिल्ह्यातील आणि परराज्यातील हजारो गणेशभक्त येत आहेत. अशा गर्दीच्या काळात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती, जी सुदैवाने टळली. त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
शहरातील गणेशोत्सव आता बॅनर, फलक आणि स्वागत कमानांमुळे गजबजून गेला आहे. नवोदित समाजसेवक, स्वयंभू राजकारणी, नेते आणि विविध संघटनांनी गणेशोत्सव मंडळांच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी मोठमोठे फलक लावले आहेत. या अनियंत्रित बॅनरबाजीने शहराच्या सौंदर्याला बाधा आणली आहे.





गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणि वाऱ्यामुळे या स्वागत कमानी आणि फलकांनी धोक्याची घंटा वाजवली आहे. अशा कमानी कधीही कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या फलकांच्या उभारणीत अनेकदा सुरक्षिततेच्या नियमांकडे दुर्लक्ष केले जाते.
गणेश दर्शनासाठी शहरात होणारी गणेशभक्तांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. अशा परिस्थितीत कमकुवत कमानी आणि बॅनरमुळे भाविकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे, संबंधित प्रशासनाने आणि गणेशोत्सव मंडळांनी यावर तातडीने लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.


