बेळगाव लाईव्ह :मंगळवार पेठ -गवळी गल्ली टिळकवाडी येथील गवळी समाजातील गीता रंजीत दावले उर्फ गवळी या विधवेच्या भीषण खुनास फक्त आरोपी गणेश लक्ष्मण दावले उर्फ गवळी हाच फक्त जबाबदार नसून त्याचे संपूर्ण कुटुंब खुनाच्या गटात सहभागी होते. त्यामुळे गणेशाची पत्नी दोन मुले आणि दोन मुली यांना ताबडतोब अटक करून त्यांच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी आणि सर्व दोषींना शिक्षा करावी, या मागणीसाठी शहरातील संतप्त गवळी समाज बांधवांनी आज बेळगाव पोलीस आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर केले.
मंगळवार पेठ -गवळी गल्ली टिळकवाडी येथील गवळी समाजातील गीता रंजीत दावले उर्फ गवळी या विधवा महिलेचा गेल्या बुधवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी तिच्या घराच्या दारातच जांबिया सदृश्य लांब चाकूने भोसकून भीषण खून करण्यात आला होता. या घटनेनंतर गवळी समाजात हल्लेखोर गणेश गवळी याच्याबद्दल संतापाची लाट उसळली होती.
याप्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मयत गीता हिचा दिर गणेश लक्ष्मा दावले उर्फ गवळी याला अटक केली आहे. तथापि आपल्या आईच्या खुनाच्या कटात आपला काका गणेश याचे सर्व कुटुंबीय देखील सामील असल्यामुळे त्यांच्यावरही कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी मयत गीताची मुले भगतसिंग रंजीत दावले उर्फ गवळी आणि रश्मी रणजीत दावले उर्फ गवळी यांनी केली आहे. सदर मागणीसाठी मंगळवार पेठ, टिळकवाडीसह शहरातील संतप्त गवळी समाज बांधवांनी आज सोमवारी सकाळी बेळगाव पोलीस आयुक्तालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले. गवळी समाजाच्या या मोर्चात पुरुष मंडळींसह मोठ्या संख्येने महिला वर्गाचा सहभाग होता.
यावेळी पोलीस आयुक्तालयासमोर गवळी समाजातील संतप्त महिलांनी आरोपी गणेश गवळी व त्याच्या कुटुंबीयांच्या नावाने शिमगा करत न्यायाची मागणी केली. आंदोलनकर्त्या महिलांनी हातात घेतलेले निषेध असे व न्यायाच्या मागणीचे फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. पोलीस आयुक्तालयाच्या ठिकाणी पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी आयुक्तांच्यावतीने निवेदनाचा स्वीकार केला.
यावेळी बोलताना त्यांनी पोलिसांना कायद्याच्या चौकटीत काम करावे लागते त्यांनाही काही मर्यादा असतात. गीता गवळीच्या खुनाचा तपास सुरू असून तिच्या हत्येस प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष कारणीभूत असलेल्या सर्वांना लवकरच गजाआड केले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच आपल्या कुटुंबात किंवा परिसरात गुंडगिरी वगैरे काही असतील तर ते नागरिकांनी त्वरित पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावे. मयत गीता आणि तिच्या कुटुंबीयांचा छळ केला जात होता असे सांगण्यात येते. ही बाब जर आसपासच्या लोकांनी वेळीच पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला असता तर पोलिसांनी योग्य ती कारवाई करून हल्लेखोराचा बंदोबस्त केला असता आणि गीताचा जीव वाचला असता. तेंव्हा यापुढे नागरिकांनी आपल्या परिसरातील गैरप्रकारांची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन पोलीस उपायुक्त नारायण बरमनी यांनी केले.
दरम्यान गवळी समाजाने विशेष करून मंगळवार पेठ गवळी गल्ली टिळकवाडी येथील मयत गीता गवळी हिची मुले भगतसिंग व रश्मी यांनी सादर केलेल्या निवेदनात गीता गवळी हिचा खून होण्यास प्रत्येक गणेश गवळी नव्हे तर त्याचे संपूर्ण कुटुंब जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. सदर कुटुंबात सविता गणेश दावले उर्फ गवळी, यश गणेश दावले उर्फ गवळी, आदित्य गणेश दावले उर्फ गवळी, स्मिता सागर गवळी आणि विजेता अक्षयकुमार कांबळे यांचा समावेश आहे. निवेदनात हे सर्वजण कशाप्रकारे आपल्या आईचा व आपला छळ करत होते.
घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देत होते. याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच शेवटी गीता रंजीत दावले उर्फ गवळी या विधवेचा अमानुष मृत्यू हा अचानकपणे एकट्याने भडकून केलेले कृत्य नव्हते तर एक अतिशय थंड रक्ताने खून होता. ज्यामध्ये आरोपी गणेश लक्ष्मण दावले उर्फ गवळी याच्या संपूर्ण कुटुंबाचा समावेश असलेल्या गुन्हेगारी कटाचा पूर्वनियोजित समावेश होता. आम्ही तुम्हाला विनंती करतो की वरील आरोपींवर त्वरित आणि कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी आणि सर्व दोषींना शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.



