बेळगाव लाईव्ह : बेळगावमधील कपिलेश्वर रोडवर असलेल्या एका घरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कपिलेश्वर मंदिरातील माजी अध्यक्ष पुजारी यांचा मुलगा सिद्धांत पुजारी (२७) याने मोबाईलवर एक धक्कादायक ‘डेथ नोट’ लिहून आत्महत्या केली आहे. या ‘डेथ नोट’मध्ये त्याने काही लोकांवर गंभीर आरोप केले असून, तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचा उल्लेख केला आहे.
सिद्धांतने ‘डेथ नोट’मध्ये आपल्या वेदना स्पष्टपणे मांडल्या आहेत. “मी कोणत्याही मुलीसाठी नाही, तर आलिशान जीवन जगता येत नसल्यामुळे आत्महत्या करत आहे,” असे त्याने सुरुवातीलाच नमूद केले आहे. पुढे त्याने लिहिले आहे, “गणपतीच्या वेळीच मला मरायचे होते, पण मोठा गणपती साजरा करून मरावे, असा विचार करून मी थांबलो.” असे या डेथ नोटमध्ये नमूद आहे.
त्याने आपल्या आत्महत्येसाठी कारणीभूत असलेल्या घटनेचाही उल्लेख केला आहे. “मी कपिलेश्वर मंदिरात पुजारी म्हणून काम करत होतो, पण तीन वर्षांपूर्वी माझ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून मला मंदिरातून बाहेर काढले गेले. तेव्हापासून माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले,” असे त्याने लिहिले आहे. या आरोपांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि मंदिराच्या परिसरात खळबळ उडाली आहे.
सिद्धांतने आपल्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनाही भावनिक आवाहन केले आहे. “माझ्या श्राद्धाला मटण बनवू नका, त्याऐवजी तुम्ही दुसरे काहीही बनवून खाऊ शकता. कुणीही रडू नका, कारण तुम्ही रडल्यास माझ्या आत्म्याला त्रास होईल,” असे त्याने लिहिले आहे. तसेच, “मी मेल्यावर जेव्हा देवाला भेटेन, तेव्हा मला त्रास देणाऱ्यांना मारण्यासाठी सांगेन,” असा एक गंभीर इशाराही त्याने दिला आहे.
७ वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा मनस्ताप करून सदर तरुणाने आत्महत्या केली असून याप्रकरणी सदर तरुणाला न्याय द्यावा अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
घटनेची माहिती मिळताच खडेबाजार पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू केला आहे. सिद्धांतच्या मोबाईलमधील ‘डेथ नोट’ तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली आहे.


