Friday, December 5, 2025

/

शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे शिवरायांचे नांव बदलू नये – श्रीराम सेना हिंदुस्तानची मागणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेंगलोर येथील शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्टेशनचे छत्रपती शिवाजी महाराज हे नांव बदलून सेंट मेरी मेट्रो स्टेशन असे करण्याच्या प्रस्तावाला आमचा तीव्र आक्षेप आहे. तेंव्हा नाव बदलण्याऐवजी त्या स्टेशनला अधिकृतपणे “छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन” म्हणून घोषित करावे, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्तान आणि हमारा देश संघटना यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कर्नाटकचे राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

श्री राम सेना हिंदुस्तान आणि हमारा देश संघटना यांनी आज सोमवारी सकाळी मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन श्री राम सेना हिंदुस्तानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीची निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकानी निवेदनाचा स्वीकार करून त्वरेने पुढील कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. मुख्यमंत्र्यांच्या बेंगलोर येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी असे ठेवण्याच्या प्रस्तावाला आमचा तीव्र विरोध आहे.

शिवाजीनगर हे नाव थेट छ. शिवाजी महाराजांच्या गौरवशाली वारशाशी जोडलेले आहे, एक राष्ट्रीय नायक जे कर्नाटक आणि संपूर्ण देशातील लाखो लोकांसाठी आदरणीय आहेत. या स्टेशनचे इतर कोणत्याही प्रकारे नांव बदलल्याने केवळ ऐतिहासिक ओळख पुसली जाणार नाही तर असंख्य नागरिकांच्या भावनांनाही धक्का बसेल. नाव बदलण्याऐवजी या स्थानकाला अधिकृतपणे “छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन” म्हणून घोषित करावे अशी आमची ठाम मागणी आहे.

 belgaum

स्वराज्य न्याय आणि सर्व धर्मासाठी लढणाऱ्या महान मराठा योद्ध्याला योग्य तो सन्मान द्या. शिवाजीनगर परिसराची सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ओळख जपली जावी. अनावश्यक वाद निर्माण करण्यापेक्षा भावी पिढ्यांना शिवरायांसारख्या राष्ट्रीय प्रतिमेच्या नावाने प्रेरित करावे. तरी आमची जोरदार विनंती की शिवाजीनगर मेट्रो रेल्वे स्टेशनचे अधिकृत नाव छत्रपती शिवाजी महाराज मेट्रो स्टेशन देऊन त्याचे सन्मानाने उन्नतीकरण करावे अशी आपण राज्य सरकारला शिफारस करावी. आम्हाला विश्वास आहे की तुम्ही लोकांच्या भावनांचा आदर कराल आणि ही मागणी कर्नाटक सरकारपर्यंत पोहोचवाल याची खात्री कराल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

SRSH

याप्रसंगी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, विद्यमान कर्नाटक सरकारने बेंगलोर येथील पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावे असलेल्या मेट्रो रेल्वे स्टेशनचे नांव बदलून सेंट मेरी ठेवण्याचा घाट रचला आहे. सेंट मेरी या नावाला आमचा कोणताही विरोध नाही तेंव्हा सरकारने इतर कोणत्याही नव्या रेल्वे स्थानकाला सेंट मेरी हे नाव द्यावं. शिवभक्तांचा त्याला कोणताही विरोध असणार नाही तथापी हे राज्य सरकार छत्रपती शिवाजी महाराजांसह समस्त शिवभक्तांचा अवमान करत असल्याचे दिसून येते. काही राजकारणी लोक स्वतःच्या स्वार्थासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करतात. तेच लोक आता रेल्वे स्टेशनवरील छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव बदलले जात असताना मूग गिळून गप्प बसलेले आहेत हे पाहून दुःख होते.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेंगलोर हे शहर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांच्या आशीर्वादाने वसले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. रेल्वे स्थानकाचे नांव बदलण्याच्या माध्यमातून विद्यमान सरकार जाणून बुजून राजकारण करत आहे असे निदर्शनास येत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि त्यांच्या पराक्रमाच्या जोरावर आपला देश टिकला आहे. आज देशांमध्ये आपण हिंदू म्हणून जगतोय ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादामुळे, तुमच्या पक्षातही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे, त्यांना मानणारे लोक आहेत.

पक्षाचा धोरणांचा आदर करत असल्यामुळे ते आवाज उठवत नसावेत. परंतु जर या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव पुसण्याचा प्रयत्न झाला तर समस्त शिवभक्त गप्प बसणार नाहीत, तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील, असा परखड इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना देऊन बेंगलोर येथील मेट्रो रेल्वे स्टेशनचे नाव बदलण्याचा प्रकार त्वरित थांबवावा, अशी विनंती समस्त शिवभक्तांच्यावतीने रमाकांत कोंडुसकर यांनी केली. निवेदन सादर करतेवेळी श्रीराम सेना हिंदुस्तान आणि हमारा देश संघटनेचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.