बेळगाव लाईव्ह: गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जीवाचे रान करणाऱ्या मनोज जरांगे -पाटील यांच्या मुंबई येथील उपोषणाला अभूतपूर्व यश मिळाल्याबद्दल सकल मराठा समाज बेळगावतर्फे आज बुधवारी सकाळी शहरातील धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे -पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला काल मंगळवारी यश आले असून महाराष्ट्र राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाबरोबरच आज बेळगाव मधील सकल मराठा समाजाच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
शहरातील मुख्य चौक असलेल्या धर्मवीर छ. संभाजी महाराज चौकातील महाराजांच्या मूर्तीला आज बुधवारी सकाळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्याद्वारे, तसेच फटाक्यांची आताशीबाजी आणि मिठाईचे वाटप करून हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला.
मराठा समाज बेळगावचे प्रमुख नेते माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, सकल मराठा समाज समन्वयक प्रकाश मरगाळे, गुणवंत पाटील रमाकांत कोंडुसकर, रणजीत चव्हाण -पाटील आदींनी छ. संभाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून नमन केले. यावेळी उपस्थित सकल मराठा समाजाचे सर्व पदाधिकारी आणि असंख्य समाज बांधवांनी छ. शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छ. संभाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, एक मराठा लाख मराठा वगैरे घोषणा देऊन चौक दणाणून सोडला होता.






आनंदोत्सवाप्रसंगी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये सुरू केलेला आपला लढा जरांगे -पाटील यांनी यशस्वी करून दाखवला आहे. आम्ही बेळगाव मधून देखील हजारोंच्या संख्येने मुंबईला जाऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर नुकतेच आमचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी मुंबईच्या आझाद मैदानावर गेले होते.
त्यावेळी उपोषणाच्या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणालाही आत सोडले जात नव्हते. त्यावेळी बेळगाव सीमा भागातील मराठा समाज व महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आल्याचे समजताच आम्हा दहा जणांची जरांगे -पाटील यांनी खास भेट घेतली. या भेटी प्रसंगी आम्ही त्यांच्याशी फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावरच बोललो नाही तर सीमा भागातील 865 मराठी गावांची मराठी भाषिकांवर कसा अन्याय होत आहे.
त्यांची मराठी मातृभाषा नामशेष करण्याचा कसा प्रयत्न केला जात आहे वगैरे बाबी आम्ही त्यांच्या कानावर घातल्या. त्यावेळी त्यांनी या संदर्भात सवडीने सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे असे सांगून कोंडुसकर यांनी मुंबईमधील जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला मराठा समाज बांधवांनी एकजुटीने आझाद मैदानावर लाखोच्या संख्येने जमून दिलेल्या अभूतपूर्व पाठिंब्याची माहिती दिली. तसेच त्यांचा आदर्श बेळगाव सीमा भागातील सर्व मराठा समाज बांधवांनी घेतला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
मालोजीराव अष्टेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महाराष्ट्रातील मराठा आरक्षणासंदर्भातील मनोज जरांगे ‘पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढ्याला मिळालेल्या यशामुळे फक्त महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील मराठा वर्गाला अत्यानंद झाला आहे, असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न होत होते. या प्रयत्नांना काल यश मिळाले असले तरी अजून थोडे यश मिळायचे आहे असे स्वतः जरांगे पाटील म्हणाले आहेत. मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करताना यापूर्वी अनेकांना प्राणही गमवावा लागला आहे.
तेंव्हा या आनंदाप्रसंगी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांचे देखील आदराने स्मरण करणे गरजेचे आहे. यासाठी मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो असे सांगून अष्टेकर यांनी जरांगे -पाटील यांचा यशस्वी लढा आणि गॅझेटीयर्सच्या दाखल्यांमध्ये कशाप्रकारे बेळगावच्या कुणबी, कुलवाडी मराठा समाजाचा उल्लेख व त्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्याचप्रमाणे मराठा समाजाला जे हवं ते मिळावे यासाठी जरांगे पाटील यांनी जे प्रयत्न केले त्यासाठी समस्त बेळगावकर व सकल मराठा समाजाच्यावतीने त्यांचे कौतुक करतो. तसेच त्यांचा आदर्श घेऊन आपण सर्वांनी मराठा समाजासाठी काही ना काही कर्तव्य पार पाडलं पाहिजे, असे आवाहन शेवटी मालोजीराव अष्टेकर यांनी केले. याप्रसंगी प्रकाश मरगाळे, शिवराज पाटील, नगरसेवक रवी साळुंखे आदींनी समयोचित विचार व्यक्त केले.


