बेळगावातील रेल्वे प्रकल्पांना राज्य सरकारचा अडसर :व्ही. सोमाण्णा

0
1
 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस सरकार रेल्वेच्या विकासकामांमध्ये अडथळे आणत आहे, असा थेट आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बेळगावातील रेल्वे विकासासाठी मोठा निधी मंजूर केला असतानाही, राज्य सरकारच्या असहकारामुळे बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पाचे काम रखडले असल्याचे सोमण्णा यांनी म्हटले.

बेळगाव भेटीवर असताना सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमण्णा यांनी रेल्वे प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, “२०२० मध्ये पुणे-लोंढा रेल्वेच्या विकासासाठी १,९०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. पुणे-मिरज दुहेरीकरणाचे कामही यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे, २०२३ मध्ये बेळगाव रेल्वे स्थानकाचे १९३ कोटी रुपये खर्चून आधुनिकीकरण करण्यात आले असून, फिट लाइन्सचे कामही पूर्ण झाले आहे.” बेळगावासह उत्तर कर्नाटकचा भाग कृषी आणि उद्योगांसाठी महत्त्वाचा असल्याने येथील रेल्वे नेटवर्कची क्षमता वाढवण्यासाठी बेळगाव-धारवाड रेल्वे प्रकल्पासाठी ९३७ कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्य सरकारच्या सहकार्याअभावी रखडला असल्याचा आरोप सोमण्णा यांनी केला. “हुबळीमध्ये अजूनही ४५ एकर जमीन संपादित करायची आहे. यासंदर्भात मी मंत्री संतोष लाड यांच्याशी दोन-तीन वेळा बोललो, पण त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

 belgaum

प्रल्हाद जोशी आणि जगदीश शेट्टर यांनीही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. मी स्वतः पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहे.” बेळगावात शंभर टक्के भूसंपादन झाले असून, राज्य सरकार असे का करत आहे, हे आपल्याला माहीत नाही, असेही त्यांनी सांगितले. “जर त्यांनी प्रतिसाद दिला नाही, तर आम्ही कायदेशीर मार्गाने कारवाई करू,” असा इशाराही सोमण्णा यांनी दिला.

याचवेळी, “संतोष लाड अजूनही तरुण आहेत, त्यांना असे का करायचे आहे, हे मला माहीत नाही. मला त्यांना शोधूनच भेटायचे आहे. मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशीही मी अनेक वेळा बोललो आहे. पण राज्य सरकारने या कामात अडथळे का आणले, हे सांगितले पाहिजे,” असेही त्यांनी नमूद केले. इतर राज्यांमध्ये सरकार विकासासाठी सहकार्य करत असताना, हे सरकार मात्र विकासकामांमध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप त्यांनी केला.

बेळगावसह खानापूर आणि इतर अनेक ठिकाणी विविध रेल्वे कामे आणि उड्डाणपुलांचे भूमिपूजन केले जाणार असल्याचे सोमण्णा यांनी सांगितले. ते म्हणाले, “देशातील रेल्वे स्थानकांचे स्वरूप बदलत आहे. पंतप्रधानांच्या ‘विकसित भारत २०४७’ या स्वप्नानुसार आम्ही वाटचाल करत आहोत. अनेक ठिकाणी नवीन रेल्वेची मागणी वाढत असून, सवदत्ती आणि रामदुर्ग दरम्यानच्या मागणीचा आम्ही निश्चितच विचार करू.” पंतप्रधान असे राज्य बदलण्याचे काम करत आहेत, जिथे आधी अराजकता होती आणि विकास झाला नव्हता, असे सांगत त्यांनी मोदींच्या कार्याची प्रशंसा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.