बेळगाव लाईव्ह : गेल्या पंधरा दिवसांपासून सुरु असलेला ऊन – पावसाचा खेळ आज थांबला असून शुक्रवारी दुपारनंतर जोरदार पावसाने हजेरी लावली. बेळगाव परिसरात अचानक पावसाळ्याची हजेरी लागल्याने खरीप हंगामातील पिकांसाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
या पावसामुळे पोसवणीच्या अवस्थेत असलेल्या भातासह इतर खरीप पिकांना मोठा फायदा झाला असून, पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. यामुळे शेतकरी वर्गात भरघोस उत्पादन मिळण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
बेळगावमध्ये प्रामुख्याने भातपीक घेतले जाते, त्यामुळे या पावसाचा भाताच्या वाढीस आणि पोसणीला मोठा फायदा झाला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच वेळेवर आणि अपेक्षित प्रमाणात पाऊस होत असल्याने पाणीटंचाईची समस्या कमी जाणवत होती.
खासकरून गतवर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांना खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन न मिळाल्याचा आढावा होता. मात्र यंदा सप्टेंबरमधील पुरेसा पाऊस झाल्यामुळे पिकांचे सुकाणू पूर्णपणे टाळता येत असून, पिकांची झपाट्याने वाढ होण्यास मदत होणार आहे.
खरीप हंगामातील पिकांचा विकास हा पावसाच्या प्रमाणावर अवलंबून असतो. सप्टेंबर महिन्यात पडलेला पाऊस पिकांना आवश्यक असलेला ओलावा पुरवतो आणि त्यामुळे पिकांची गुणवत्ता तसेच उत्पादन वाढण्यास मदत होते. यामुळे शेतकऱ्यांना यंदा भरघोस आणि दर्जेदार उत्पादन मिळेल, अशी सर्वसाधारण अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शेतकऱ्यांनी या अनुकूल हवामानाचा फायदा घेऊन त्यांच्या शेतात वेळेवर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पाण्याच्या योग्य व्यवस्थापनाने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे सप्टेंबरच्या पावसाने बेळगाव परिसरातील खरीप पिकांचे भवितव्य उज्वल झाले आहे, चित्र सध्या दिसून येत आहे.


