बेळगाव लाईव्ह : खानापूर तालुक्यात सोन्याची चोरी केल्याच्या संशयावरून १८ वर्षांच्या तरुणाला मारहाण करून संपवण्यात आले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी न्याय मागितला आहे. वेंकटेश मयेकर (१८) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रुमेवाडी क्रॉस येथील एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेंकटेशवर हॉटेल मालकाने सोने चोरीचा आरोप केला. यानंतर त्याला एका खोलीत डांबून ठेवले आणि निर्दयीपणे मारहाण केली. मारहाणीमुळे गंभीर जखमी झालेल्या वेंकटेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वेंकटेशच्या भावाने, महाबळेश्वर मयेकर यांनी, या घटनेला हॉटेल मालकच जबाबदार असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “माझ्या भावाला हॉटेल मालक आणि त्याच्या भावाने चोरीच्या संशयावरून बेदम मारहाण केली. पोलिसांत तक्रार करू नये म्हणून त्यांनी आम्हाला धमकावले. त्याची प्रकृती खूप बिघडल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान तो वाचू शकला नाही.”
हॉटेलमध्ये ५ तोळे सोने कोण ठेवते, असा सवाल करत, महाबळेश्वर यांनी आपल्या भावाच्या खुन्यांना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.
अर्जुन शंकर मराठे यांनीही हॉटेल मालक नागेश गुंडू बेडरे आणि त्याचा भाऊ विजय गुंडू बेडरे यांनीच हा खून केल्याचा आरोप केला आहे. तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी सांगितले.







खानापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, मृत तरुणाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन बेळगाव जिल्हा रुग्णालयात झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.




