बेळगाव लाईव्ह :बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वासाचा ठराव गेल्या शनिवारी मंजूर झाल्यामुळे प्रभारी अध्यक्ष म्हणून बारासोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. बसवराज एम. मुगळी यांची निवड करण्यात आली आहे.
बेळगाव बार असोसिएशन अध्यक्षांवरील अविश्वासाच्या ठरावा संदर्भात गेल्या शनिवारी बार असोसिएशनच्या सभागृहात सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उपस्थित वकिलांनी अविश्वास ठराव आणण्यासाठी मतदान घेण्याची जोरदार मागणी केली.
त्यानुसार ॲड. विनय मांगलेकर व ॲड. के. बी. नाईक यांच्या निरीक्षणाखाली बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला गेला. त्यानंतर त्या दिवशी दुपारी 3:30 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली.
त्यावेळी एकूण 629 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी 428 जणांनी बार असोसिएशनचे अध्यक्ष विद्यमान अध्यक्ष ॲड. किवडसन्नावर यांच्या विरोधात, तर 194 जणांनी त्यांच्या बाजूने मतदान केले. तसेच 7 मते अवैध ठरली. परिणामी 428 जणांनी विरोधात मतदान केल्यामुळे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसन्नावर यांच्यावरील अविश्वास ठराव पारित करण्यात आला. त्यानंतर सर्वानुमते उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
यंदा बेळगाव बार असोसिएशनला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने येत्या ऑक्टोबर महिन्याच्या 4 व 5 तारखेला वर्धापन दिन आयोजित करण्यात आला आहे. यासाठी केंद्रीय व राज्य कायदामंत्री त्याचबरोबर न्यायमूर्ती, न्यायाधीशांना आमंत्रित करण्यात आले आहे. तथापि आता अध्यक्षांवरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यामुळे वर्धापन दिन कार्यक्रमाबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून हा कार्यक्रम पुढे ढकलला जाण्याची दाट शक्यता आहे.


