बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे आगामी दसरा महोत्सवासंदर्भात खडेबाजार पोलीस ठाण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांसमवेत दसरा उत्सव व श्री दुर्गामाता उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आज पार पडली.
पोलीस प्रशासनाने बोलाविलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खडेबाजार उपविभागाचे एसीसी शेखरप्पा हे होते. सदर बैठकीत कॅम्प, चव्हाट गल्ली, कांगली गल्ली, गोंधळी गल्ली येथील आगामी दसरा आणि श्री दुर्गामाता उत्सवाबाबत चर्चा करण्यात आली.
बैठकीत मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना एसीपी शेखरप्पा यांनी प्रतिवर्षाप्रमाणे श्री दुर्गामाता आगमन आणि विसर्जन सोहळा लवकरात लवकर वेळेत पार पाडून प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्वांनी ज्या पद्धतीने श्री गणेशोत्सव शांततेने साजरा केला, त्या पद्धतीने दसरा सण व दहा दिवसांचा श्री दुर्गामाता उत्सव शांततेने साजरा करावा.
या दरम्यान कांही अडचण उद्भवल्यास सहकार्यासाठी नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. एकंदर दरवर्षीप्रमाणे सर्वांनी जातीय सलोखा राखून दसरा व श्री दुर्गामाता उत्सव उत्साहाने शांततेत साजरा करावा, असे आवाहन एसीपी शेखरप्पा यांनी केले.
बैठकीस चव्हाट गल्ली दसरा उत्सव मंडळाचे पदाधिकारी सुनील जाधव यांच्यासह कॅम्प, कांगली गल्ली व गोंधळी गल्ली येथील उत्सव मंडळांचे पदाधिकारी आणि सदस्य, तसेच संबंधित पोलिस अधिकारी उपस्थित होते.




