बेळगाव लाईव्ह विशेष : जिद्द, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा असेल, तर कोणतेही स्वप्न साकार करणे शक्य आहे, हे बेळगावच्या डॉ. श्रुती श्रीकांत पाटील यांनी सिद्ध करून दाखवले आहे. वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही आपल्या ‘अधिकारी’ बनण्याच्या स्वप्नाचा पाठलाग करत त्यांनी कर्नाटक पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक (PSI) म्हणून यश मिळवले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी राज्यात नववा क्रमांक पटकावत हे यश संपादन केले आहे.
मूळच्या बेळगाव तालुक्यातील उत्तर भागातील जाफरवाडी आणि सध्या कंग्राळी येथील मार्कंडेय नगरच्या रहिवासी असलेल्या ३२ वर्षीय डॉ. श्रुती श्रीकांत पाटील, सध्या पतीसोबत मुंबईतील वरळी येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे शिक्षण मराठी माध्यमातून झाले असले तरी, त्यांनी कन्नड भाषेतून परीक्षा देत हे नेत्रदीपक यश मिळवले आहे. यामुळे मराठी भाषिकांसाठी त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.
श्रुती यांचे शालेय शिक्षण महिला विद्यालय मराठी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयातून त्यांनी पदवीपूर्व शिक्षण पूर्ण केले. यानंतर, त्यांनी भरतेश होमिओपॅथिक महाविद्यालयातून बीएचएमएसची पदवी घेतली. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असतानाच त्यांना स्पर्धात्मक परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली. यासाठी बेळगावच्या तत्कालीन जिल्हाधिकारी शालिनी रजनीश यांचा आदर्श आणि वडिलांचा व कुटुंबीयांचा पाठिंबा त्यांच्यासाठी महत्त्वाचा ठरला.
आपल्या वैद्यकीय व्यवसायातून पोलीस दलाकडे वळण्याचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी अथक परिश्रम घेऊन कर्नाटक लोकसेवा आयोग (KPSC) च्या परीक्षा दिल्या, मुलाखती पर्यंत पोचल्या मात्र संधी थोडक्यात हुकली पण तिने जिद्द सोडली नाही अधिकारी बनण्याचे स्वप्न कायम उराशी बाळगले. त्यांच्या वडिलांचा लाकडावर कोरीव काम (carvings) करण्याचा व्यवसाय आहे, तर आई सुरेखा गृहिणी असून वडिलांच्या कामात त्यांना मदत करतात.श्रुती यांचे मार्कंडेय येथील एकत्र कुटुंबीय असून वडिलांसोबत काकांचे देखील मोलाचे मार्गदर्शन आणि मदत लाभली आहे.
श्रुती यांचे पतीही वैद्यकीय क्षेत्रातच एमडी असून, त्यांनीही श्रुती यांच्या या निर्णयाला पूर्ण पाठिंबा दिला.
श्रुती यांनी २०२० साली झालेल्या पीएसआय परीक्षेसाठी अर्ज केला होता. धारवाड येथे त्यांनी ही परीक्षा दिली. २०२१ साली शारीरिक (Physical) परीक्षा झाली आणि त्यानंतर २०२४ मध्ये लेखी परीक्षा पार पडली. या सर्व टप्प्यांवर यशस्वी होऊन, १० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या अंतिम निकालात त्यांनी राज्यात ९ व्या क्रमांकासह यश मिळवले. त्यांची निवड सिव्हिल पोलीस उपनिरीक्षक पदासाठी झाली आहे आणि त्यांची बंगळूरमध्ये नियुक्ती झाली आहे.
या यशाबद्दल बोलताना, डॉ. श्रुती श्रीकांत पाटील (सध्याच्या श्रुती ऋषिकेश देसाई) यांनी आपल्या कुटुंबाचे, विशेषतः वडील आणि पती यांचे आभार मानले. “हे यश फक्त माझे नाही, तर माझ्या आई-वडिलांचे, काकांचे पतीचे आणि संपूर्ण कुटुंबाचे आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते,” असे त्या म्हणाल्या.
विवाहपूर्वी दिलेल्या स्पर्धात्मक परीक्षेचा निकाल लागताच पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घालणाऱ्या श्रुतीला लग्नानंतर सासरच्या मंडळीकडून ही सेवा बजावण्यासाठी मिळालेला परिपूर्ण पाठिंबा हा ज्या पितृसत्ताक समाजाला एक आदर्शवत उदाहरण दिल्यासारखे आहे. सासरच्या मंडळींच्या पाठिंबा शिवाय आपण सेवेत रुजू होणे शक्य नाही.
श्रुतीच्या या यशाच्या प्रवासात तिने दररोज कलावती आईचे भजन म्हटल्याने तणाव कमी होतो त्यामुळे हे यश मिळाल्याचे म्हटले आहे.
अनेकदा मराठी माध्यमात शिकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये एक न्यूनगंड असतो की, परभाषेत स्पर्धा करणे कठीण आहे. परंतु, डॉ. श्रुती पाटील यांनी आपले प्राथमिक शिक्षण मराठी माध्यमात घेऊनही कन्नड भाषेतून ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांच्या यशाने हेच सिद्ध होते की, ध्येय गाठण्यासाठी भाषा किंवा माध्यम कोणतीही अडचण ठरत नाही. कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणत्याही भाषेतून स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळवता येते, हा संदेश त्यांच्या यशातून सर्व मराठी तरुणांना मिळाला आहे.
जाफरवाडीच्या या कन्येने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. त्यांचे हे यश अनेकांसाठी आदर्श ठरेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.


