बेळगाव लाईव्ह :बेळगाव लाईव्ह : जात व शैक्षणिक संदर्भात होणाऱ्या जनगणनेच्या अनुषंगाने मराठा समाजाची बैठक जत्तीमठ येथे पार पडली.जाती निहाय जनगणना 22 सप्टेंबर पासून कर्नाटक राज्यात प्रारंभ होत आहे. मराठा समाजाने या जातीय जनगणनेत आपली नोंद कशी करावी यासाठी जनजागृती करण्याच्या नियोजनासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे होते. मराठा समाजाचे झालेले अवमूल्यन रोखण्यासाठी व मराठा समाजाला शैक्षणिक, नोकरी व सरकारी योजनात आरक्षण व लाभ मिळण्यासाठी कुणबी म्हणून नोंद करावी. त्यासाठीच्या जनगणनेतील फॉर्ममध्ये 8,9,10, व15 या अनुक्रमांकवर धर्म -हिंदू, जात – मराठा, पोट जात – कुणबी आणि मातृभाषा- मराठी असा उल्लेख करावा असे मार्गदर्शन करण्यात आले. तरुण युवक व कार्यकर्त्यांनी याच पद्धतीने रीतसर जनजागृती करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले.
यावेळी बोलताना रमाकांत कोंडुस्कर म्हणाले, या जनजागृतीत युवकांनी धडाडीने काम करणे गरजेचे आहे. मराठा समाजातील महिलांना विशेष नोंदणीच्या बाबतीत सजग करणे गरजेचे आहे असे त्यांनी नमूद केले.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्रकाश मरगाळे यांनी मराठा समाजातील पुढच्या पिढीचे भविष्य घडवायचे असेल, त्याचबरोबर त्यांना सरकारी योजना, नोकरी व शैक्षणिक लाभ मिळवून द्यायचे असतील तर मराठा समाजाने कर्तव्याने आपली नोंदणी कुणबी म्हणून करून घेणे गरजेचे आहे. कारण मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून लाभ मिळवून दिले त्याच धर्तीवर आपण प्रयत्न केले पाहिजे असे प्रतिपादन केले.
सकल मराठा समाजाचे किरण जाधव यांनी सर्व राजकीय पक्षातील मराठा कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी, महिलांनी एकत्रित येऊन समाजासाठी काम केले पाहिजे. त्याच बरोबर ज्या पद्धतीने पत्रके दिली जातील ती गल्लोगल्ली, गावोगावी व प्रत्येक घरात वाटून जनजागृती करावी असे मत व्यक्त केले.
सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते ॲड.अमर येळळूरकर यांनी कुणबी नोंद करण्याचे फायदे आणि त्यातील कायदेशीर बाबी नमूद करताना मराठा समाजातील जनतेने जनगणनेत कुणबी नोंद करण्याबरोबर शाळेत, कॉलेज, बालवाडीत किंवा जन्म दाखला घेताना देखील मराठा कुणबी अशी नोंद करावी त्यामुळे पुढील आरक्षणाचे फायदे नक्कीच मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
बैठकीचे प्रस्ताविक शिवराज पाटील यांनी केले तर सकल मराठा समाजाचे समन्वयक गुणवंत पाटील यांनी आभार मानताना मराठा समाजातील सर्व घटकांनी एक दिलाने काम करून जनजागृती केली पाहिजे त्याचबरोबर रविवार 21 सप्टेंबर रोजी बेळगाव शहरातील मराठा मंदिर सभागृहात सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या मराठा भव्य मेळाव्यात मराठा समाजातील सर्व लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.




