बेळगाव लाईव्ह विशेष :नांगर घेतलेले सृजनशीलतेचे प्रतीक म्हणजे कुणबी, आणि शस्त्र धारण करून शौर्याचे प्रतीक म्हणजे मराठा… दोन्हीही एकाच नाण्याच्या दोन बाजू, दोन्हीही वृत्ती सांगणाऱ्या शब्दांची निष्पत्ती.
कर्नाटकात चालू असणाऱ्या जनगणतीत मराठा समाजाचे स्थान कोणत्या पद्धतीने मांडायचे यासंबंधी मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू आहे. जनगणनेच्या फॉर्ममधीलक्रमांक आठ ,नऊ, दहा आणि पंधरा या क्रमांकावर अनुक्रमे धर्म हिंदू ,जात मराठा ,पोटजात कुणबी आणि मातृभाषा मराठी अशी नोंद करावी असे आवाहन मराठा समाजातर्फे केले जात आहे. ही अशीच नोंद का करावी यामागे निश्चित धोरण मांडले जातआहे, मराठा समाजाची एकत्रित जनसंख्या कर्नाटकात किती आहे त्यावरून मराठा समाजाला आरक्षणात किती फायदा मिळेल ते ठरणार आहे. त्यामुळे जितकी मराठा समाजाची संघटित शक्ती दाखवू तेवढा मराठा समाजाला फायदा अधिक हे सूत्र समजून घेऊन यावेळी या एकंदर प्रक्रियेत आपण कशा पद्धतीने आपली नोंद केली पाहिजे यासाठी सजग रहायला पाहिजे, अशी जागृती मराठा समाजातर्फे केली जात आहे.
1960 ला कर्नाटकात जनगणना झाली त्यावेळी मराठा समाजाची नोंद अनुसूचित जातीत करणार अशी हवा निर्माण झाली होती परंतु तत्कालीन अर्थमंत्री सोंडूरचे सरकार एम. व्हाय. घोरपडे यांनी आम्ही राजकर्ते आम्ही कसे अनुसूचित जमातीत जाऊ म्हणून याला विरोध केला. तत्कालीन परिस्थितीत मराठ्यांच्या अर्थव्यवस्था उत्तम असल्यामुळे मराठा समाजावर विशेष प्रभाव पडला नाही. पण काळपरत्वे मराठा समाजाच्या एकत्र कुटुंब पद्धतीत बदल होऊन कुटुंबे स्वतंत्र होत गेली त्यामुळे जमिनीचे हिस्से होत एकेकाळी मोठा जमीनदार समजणारा मराठा समाज बहुतांशी अल्पभूधारक झाला. त्याचबरोबर निसर्गाचे चक्र लहरी बनल्यामुळे दुष्काळ अतिवृष्टी रोगराई यामुळे शेतीतून येणारे उत्पन्न घाट्यात जाऊ लागले, शेती न परवडणारी झाली. कधीकाळी तालेवार समजल्या जाणार्या मराठा समाजावर अक्षरशः देशोधडीला लागण्याची वेळ आली. अठरापगड जातीशी नेहमी जुळवून घेणाऱ्या मराठा समाजाला आपल्याच पुढील पिढीची चिंता सतावू लागली. अन्य समाज आरक्षणाच्या कक्षेत येऊन त्यांची प्रगती साधत असताना मराठा समाजातील नवी पिढी मात्र आर्थिक विवंचनेत हतबल झालेली दिसत होती.
शेतीत उत्पन्न नाही, उत्तम शिक्षण घेऊनही नोकरी नाही, व्यवसाय करण्यासाठी भांडवल नाही अशा कात्रीत सापडलेला मराठा तरुण नकळत व्यसनाधीनतेकडे भरकटला गेला. मराठा समाजातील क्रयशक्तीचे अशा पद्धतीने होणारे नुकसान कोणत्याही परिस्थितीत भरून निघत नाही. ही परिस्थिती सामाजिक दृष्ट्या भयावह अशी आहे. ह्या प्रतिकूल परिस्थितीत एक आशेचा किरण या जनगणनेच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहे त्याचा लाभ मराठा समाजाने डोळसपणे घेणे गरजेचे आहे.
मराठा आणि कुणबी यांची उत्पत्ती आणि सामाजिक स्तर याबाबत अनेक मतप्रवाह आहेत त्यामुळे मराठा समाजातील काही घटकांना आपली नोंद करताना कुणबी करावी की न करावी अशी शंका सतावत आहे. तत्कालीन सामाजिक जीवनात शेतकरी तो कुणबी आणि सैन्यात असणारा तो क्षत्रिय अशी ढोबळ वर्गवारी होती. पुढे राहणीमान ,सामाजिकस्तर, जगण्याची पद्धत यातून मराठा आणि कुणबी यांच्यात भेद दाखवण्याची परंपरा निर्माण झाली. परंतु अनेक संदर्भानुसार मराठा आणि कुणबी एकच आहेत आणि केवळ व्यावसायिक भेदाभेदामुळे त्यांच्यात दोन वर्ग करण्यात आले ही बाबच नजरेआड होत गेली. डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या ज्ञानकोशामध्ये विभाग क्रमांक एक पृष्ठ क्रमांक 427 वर कुणबी व मराठे या दोन जाती नसून दोन निराळे वर्ग आहेत असा स्पष्ट उल्लेख आहे. सातारा गॅझेट व हैदराबाद गॅझेट मध्येही कुणबी मराठा हे एकच असल्याचा उल्लेख आहे. मराठ्यांच्या आणि कुणब्यांच्या चालीरीती , नातेसंबंध यांच्या बाबतीत विशेष फरक आढळत नाही केवळ आर्थिक आणि व्यावसायिक फरकामुळे त्यांच्या जगण्याच्या पद्धतीत फरक जाणवतो. कित्येकदा आर्थिक स्थर सुधारल्यानंतर कुणब्यानी आपली मराठे म्हणून ओळख सांगण्यास सुरुवात केली. आणि ती भेदाची रेष अस्पष्ट असल्यामुळे सहज मान्य होऊन गेली.

‘ कुलंबीजं’ या संस्कृत शब्दातील शेवटचे अक्षर ‘ जं’ याचा लोप होऊन नंतर कुळंबी व पुढे कुणबी हा शब्द रूढ झाला आहे. कुलंबीजं म्हणजे सर्व कुळांचे मूळ बीज म्हणजेच मूळचे आर्य अशी उत्पत्ती ल. श्री. नाडे यांनी ,’ 96 कुळी मराठा क्षत्रिय संक्षिप्त इतिहास वंश गोत्रे कुळे’ या पुस्तकात सांगितली आहे. त्याच पुस्तकात पुढे उत्तरेकडील पुरुषांकडूनआलेली आर्य संस्कृती आणि दक्षिणेतील द्रविड संस्कृती यांच्या मिलनातून महाराष्ट्र देशात निर्माण झाले ते म्हणजेच मराठे असा उल्लेख आहे. कै. काशीराव बापूजी देशमुख यांनी ‘मराठा क्षत्रियांचा सचित्र इतिहास ‘ या ग्रंथात वैदिक ग्रंथ, जुने गॅजेट्स आणि इतर संदर्भ ग्रंथ पडताळून मराठे आणि कुणबी, देसाई, देशमुख, पाटील ,लेवा राणे ,राजपूत हे सर्व एकच आहेत हे नमूद केले आहे.
मराठा हा एक वर्ण असून यामध्ये शेतकऱ्यापासून राजापर्यंत सर्व व्यवसाय करणारे लोक आढळतात असा उल्लेख ग्रंथात आढळून येतो. त्यामुळे केवळ अहंभाव न बाळगता आपली नोंद कुणबी अशी करून मराठा समाजाची स्थिती, गती आणि परिस्थिती सुधारण्याची ही संधी मराठा समाजाने दवडता कामा नये. महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी नोंद करून मराठ्यांना आरक्षण मिळवून दिले त्याचबरोबर अनेक मराठ्यांना नोकरीत संधी मिळाल्या त्यामुळे ती कुटुंबे आर्थिक दृष्ट्या सुदृढ होण्यास मदत होऊ लागली. अशीच संधी मराठा कुटुंबीयांना कर्नाटकात आली आहे ती नेमकेपणाने साधली पाहिजे असे मत मराठा समाजातील सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.
गुणवंत पाटील ( समन्वयक सकल मराठा समाज बेळगाव)



