बेळगाव लाईव्ह : बेळगावातील मराठी भाषिकांच्या विरोधात कन्नड संघटनांनी पुन्हा एकदा आगपाखड सुरु केली असून आता गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजणाऱ्या मराठी गाण्यांवरूनही त्यांनी आक्षेप घेतला आहे. मराठी फलक काढण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यात आल्यानंतर, या संघटनांनी मराठी गाण्यांवरून वाद उकरून काढत, मराठी भाषिकांच्या सांस्कृतिक अधिकारांवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
कर्नाटक रक्षण वेदिका शिवरामेगौडा गटाच्या कार्यकर्त्यांनी तसेच जयकर्नाटक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी बेळगाव महानगरपालिकेवर मोर्चा काढला. ‘राज्य सरकार कन्नड भाषेची सक्ती करत असतानाही महापालिका अधिकारी आदेशांचे पालन करत नाहीत. जर तुम्हाला सरकारच्या आदेशांचे पालन करता येत नसेल, तर नोकरी सोडून घरी बसा आणि मराठी फलक हटवा,’ अशी मागणी त्यांनी अधिकाऱ्यांकडे केली.
या संघटनांनी आधी गणेश मूर्तींच्या विसर्जनामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा पुढे केला. पण आता ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ करत त्यांनी मराठी गाण्यांवरून नवा वाद सुरू केला आहे. गणेशोत्सवाच्या नावाखाली राजकारण करत त्यांनी महापालिका आयुक्तांनाही यात ओढले. ‘समिती कार्यकर्त्यांनी मराठी गाणी लावून नाच केला’, असा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करून त्यांना हद्दपार करण्याची हास्यास्पद मागणीही त्यांनी केली.
सीमाभागातील या तथाकथित कन्नड संघटनांची अवस्था कधीही, कुठेही आणि कशीही ‘रानात उगणाऱ्या गवतासारखी’ आहे. त्यांच्या मागण्यांना कोणताही ठोस आधार नसतो. संविधानिक अधिकारांची माहिती नसताना, केवळ ‘हद्दपार’ आणि ‘कारवाई’ या दोन शब्दांभोवती त्यांचे राजकारण फिरत राहते.
या संघटनांनी बेळगावच्या ऐतिहासिक गणेशोत्सव मिरवणुकीचे राजकारण सुरू केले आहे. बेळगावचा गणेशोत्सव नेहमीच सर्वसमावेशक राहिला आहे. अशा शांतताप्रिय वातावरणात या संघटना जाणीवपूर्वक वाद निर्माण करून बेळगावची शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बेळगावमधील गणेशोत्सव जात, धर्म, भाषा यांच्यापलीकडे जाऊन सर्वजण हा उत्सव गुण्यागोविंदाने साजरा करतात. अशा संघटनांनी बेळगावचा सांस्कृतिक इतिहास तपासावा आणि शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू नये, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.




