बेळगाव लाईव्ह :म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा कुस्ती स्पर्धा आणि सीएम चषक कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवून परतलेल्या डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या मुलींच्या संघाचे कडोली ग्रामस्थ आणि बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे आज सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर भव्य स्वागत करण्यात आले.
म्हैसूर येथील देवराज कुस्ती आखाडा येथे गेल्या 22 ते 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत राज्यस्तरीय दसरा कुस्ती स्पर्धा आणि सीएम कुस्ती स्पर्धा पार पडली. सदर स्पर्धांपैकी सीएम चषक कुस्ती स्पर्धेतील मुलींच्या विभागाचा सर्वसाधारण सर्वंकष अजिंक्यपदाचा करंडक डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या संघाने हस्तगत केला.
तसेच कडोली, बेळगावच्या स्वाती पाटील हिने मल्लयुद्धाचे चमकदार प्रदर्शन करताना ‘कर्नाटक किशोरी’ हा किताब पटकावला.
दसरा व सीएम चषक कुस्ती स्पर्धेत सुयश मिळवणाऱ्या स्वाती पाटील (सुवर्ण पदक) हिच्यासह भक्ती पाटील (सुवर्ण पदक) सानिका हिरोजी (सुवर्ण पदक), बी. चैतन्या (सुवर्ण पदक), नंदिनी (रौप्य पदक), यशस्विनी (रौप्य पदक),

अनुश्री चौगुले (रौप्य पदक), संध्या शिरकुट्टी (रौप्य पदक), प्रांजल तुळजाई (कांस्य पदक) आणि भाग्यश्री (कांस्य पदक) यांचे आज बुधवारी सकाळी आपल्या प्रशिक्षकांसह म्हैसूरहून बेळगाव रेल्वे स्थानकावर आगमन झाले. याप्रसंगी त्यांच्या समवेत डीवायईएस कुस्ती प्रशिक्षिका स्मिता पाटील, प्रशिक्षक नागराज, मंजुनाथ मादार आणि हणमंत पाटील उपस्थित होते.
यशस्वी कुस्तीपटू आणि प्रशिक्षकांचे बेळगाव रेल्वे स्थानकावर कडोली ग्रामस्थ आणि बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेतर्फे उस्फूर्त जल्लोषी स्वागत करण्यात आले. जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिर्जे तसेच कडोली ग्रामस्थांनी यशस्वी कुस्तीपटू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे शाल आणि पुष्पहार घालून स्वागत केले.
यावेळी बोलताना सुधीर बिर्जे यांनी समयोचित विचार व्यक्त करून यशस्वी क्रीडापटूनसह त्यांचे प्रशिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले. कडोली ग्रामपंचायतचे अध्यक्ष सागर पाटील यांच्यासह कडोली ग्रामस्थ आणि बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे सेक्रेटरी ज्योतिबा हुंदरे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, अभिजीत पाटील, मंथन हणमशेठ, आनंद तावरमठ, दीपक फडके, विनायक मुतगेकर आदींसह कुस्तीपटूंचे पालक आणि कडोली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



