जांबोटी येथील मागासवर्गीय कॉलनीतील संतप्त नागरिकांनी जांबोटी ग्रामपंचायतवर मोर्चा काढून पंचायतीतील भ्रष्टाचाराचा जाब विचारण्याची घटना नुकतीच घडली.
सदर मोर्चाप्रसंगी आपल्या मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी मागासवर्गीय खात्यामार्फत आलेल्या विशेष निधीचा वापर न करता परस्पर पैसे लाटल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला.
गेल्या पाच वर्षांत मागासवर्गीय कॉलनीच्या विकासासाठी गटार बांधकाम, समुदाय भवन दुरुस्ती, सोलार दिवे, विजेची थकबाकी भरणे आदी विविध कामांसाठी निधी मंजूर झाला होता.
मात्र प्रत्यक्षात कोणत्याही कामाची अंमलबजावणी न झाल्याने कॉलनीमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. ड्रेनेजचे सांडपाणी विहिरींमध्ये मिसळत असल्याने विहिरीतील पाणी दूषित होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे नागरिकांनी ग्रामपंचायतच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
या संदर्भात बोलताना तत्कालीन ग्रामपंचायत अध्यक्षांनी मंजूर झालेला निधी अजून खर्चच झाला नसून तो ग्रामपंचायतीकडे पडून असल्याचे सांगितले. यावर विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी जर भ्रष्टाचार झाला असेल तर निधीची वसुली करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, अशी भूमिका मांडली.
दलित नेते संतोष तलवार यांनीही नागरिकांच्या आरोपांना दुजोरा देत, मागासवर्गीयांच्या विकासासाठी आलेल्या निधीचा जाणीवपूर्वक दुरुपयोग झाल्याचे स्पष्ट केले. या प्रकरणी जिल्हा परिषद व संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात येईल.
तसेच गरज पडल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. संतप्त नागरिकांच्या मोर्च्यामुळे ग्रामपंचायतीत खळबळ उडाली असून, नागरिकांच्या मागण्यांना प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देऊन कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.


