बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरातील जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट बंद करू नये, अशी मागणी करत सदर मार्केट मधील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज सोमवारी सकाळी जोरदार निदर्शने आणि धरणे सत्याग्रह करण्याद्वारे तीव्र आंदोलन छेडले.
जय किसान होलसेल भाजी मार्केट व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखालील व्यापारी व शेतकऱ्यांनी आज सकाळी बेळगाव महापालिकेसमोर मोठ्या संख्येने जमून आंदोलन केले. यावेळी जमिनीवर ठिय्या मारून धरणे सत्याग्रह करणाऱ्या व्यापारी आणि शेतकऱ्यांनी सरकार व बुडा आयुक्तांच्या नावाने शिमगा करताना ‘मार्केट आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे’ यासारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.
त्यानंतर जय किसान होलसेल भाजी मार्केट बंद केले जाऊ नये अशी मागणी करत यावेळी व्यापारी व शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी महापालिका आयुक्त शुभा बी. यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले. तत्पूर्वी त्यांनी मनपा आयुक्त समोर आपली बाजू मांडली. जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटच्या बाबतीत घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नये.
संबंधित सर्व अधिकृत कागदोपत्रांची पूर्तता करून कायद्याच्या चौकटीत हे मार्केट चालवताना सरकारने आमच्याकडून आजपर्यंत 2 कोटी रुपयांहून अधिक कर भरून घेतला आहे. आमचे घामाचे हे पैसे पैसे नव्हेत का? कराचे पैसे भरून घेताना मार्केट अनधिकृत आहे हे कळाले नाही का आता सदर मार्केट व्यवस्थित भरभराटीमध्ये सुरू असताना अचानक ते बंद करणे कितपत योग्य आहे.
हे म्हणजे एखाद्या समोरील भरलेले जेवणाचे ताट काढून घेण्यासारखे आहे. जय किसान होलसेल भाजी मार्केट व्यापारी संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी व उत्कर्षासाठी झटत आहे. दुसरीकडे तुम्ही प्रथम एपीएमसी भाजी मार्केटमधील व्यापारी खरे आहेत का? याची शहानिशा करावी.
भाजी व्यापारी नव्हे तर मोठमोठ्या व्यवसायिकांनी त्या ठिकाणचे दुकान गाळे चालवण्यास घेतले आहेत. हे चुकीचे आहे खरे तर शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्याचे हित समजणाऱ्या व्यापाऱ्यांना ते गाळे दिले गेले पाहिजेत. ज्यांना आपला स्वार्थ साधायचा आहे त्यांनी शेतकऱ्यांचे हित जपण्याच्या आमच्या मार्गात अडथळा न आणता बेळगाव जिल्ह्यात किंवा राज्यात कुठेही आपली दुकाने थाटावीत.
एपीएमसीमध्ये आम्हा शेतकऱ्यांना कधीही न्याय मिळालेला नाही. तेथील आम्ही शेतकऱ्यांनी निवडून दिलेले संचालक मंडळ असू दे किंवा तेथील सेक्रेटरी हे नेहमी शेतकरी विरोधी लोकांची बाजू घेऊन शेतकऱ्यांचे खच्चीकरण करत आले आहेत. जय किसान भाजी मार्केट हे राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे बैलहोंगल, सौंदत्ती, कित्तूर, खानापूर वगैरे परगावच्या शेतकऱ्यांसाठी सोयीचे पडत होते. मात्र हे मार्केट बंद केल्यामुळे या शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून त्यांना त्रास, मनस्ताप सहन करावा लागत आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट तात्काळ पूर्ववत सुरू करण्यास परवानगी दिली जावी, अशी मागणी या मार्केटमधील व्यापारी व शेतकरी नेत्यांनी केली.
निवेदनाचा स्वीकार करून मनपा आयुक्त शुभा बी. यांनी जय किसानच्या व्यापारी व शेतकऱ्यांच्या मागणी संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. याप्रसंगी जय किसान भाजी मार्केट मधील सर्व व्यापाऱ्यांसह बेळगाव तालुका व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी व्यापारी व शेतकरी नेत्यांनी बेळगाव शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्या समोर देखील आपली व्यथा मांडली. व्यापारी व शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता.



