बेळगाव लाईव्ह : गांधीनगर येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ‘जय किसान भाजी मार्केट’च्या भू-वापर बदलाच्या वादावर सुरू असलेली कायदेशीर लढाई आता अधिक लांबणीवर पडली आहे. या प्रकरणातील उच्च न्यायालयाची सुनावणी पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली असून, पुढील सुनावणी आता ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे. या निर्णयामुळे भाजी मार्केट व्यवस्थापनाला अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही.
‘जय किसान भाजी मार्केट’च्या व्यवस्थापनावर मृत व्यक्तीच्या नावावर खोटी कागदपत्रे वापरून जमिनीचा भू-वापर बदलून घेतल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे ‘बुडा’ने भू-वापर बदलाचा आदेश रद्द केला होता. ‘बुडा’च्या या निर्णयाविरोधात जय किसान भाजी मार्केटने उच्च न्यायालयात धाव घेतली असून, ‘बुडा’च्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे.
मागीलवेलच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती रजेवर असल्यामुळे प्रकरण पुढे ढकलले गेले होते. सदर सुनावणी १२ सप्टेंबर रोजी करण्यात येणार होती मात्र आजदेखील हि सुनावणी लांबणीवर पडली असून पुढील सुनावणी ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.
याप्रकरणी ज्येष्ठ शेतकरी नेते सिद्दगौडा मोदगी यांच्या वतीने ॲडव्होकेट नितीन बोळबंदी यांनी न्यायालयात बाजू मांडली. न्यायालयाने या प्रकरणी स्थगिती देण्यास नकार दिल्याने, आता पुढील सुनावणीसाठी ३० ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.


