बेळगाव लाईव्ह : जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट वर अन्याय नको; ते पूर्ववत सुरू करा, या मागणीसाठी या मार्केटमधील व्यापारी आणि शेतकऱ्यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून शक्तीप्रदर्शन केले.
शहरानजीकच्या राष्ट्रीय महामार्गाशेजारील जय किसान भाजी मार्केटपासून गांधीनगर ओव्हर ब्रिज सर्व्हिस रोडमार्गे आजच्या मोर्चाला प्रारंभ झाला. सदर मोर्चा मध्ये हातात जय किसान भाजी मार्केटच्या फलकांसह न्यायाच्या मागणीचे फलकं घेऊन स्थानिक तसेच सौंदत्ती, कित्तूर, खानापूर, बैलहोंगल वगैरे विविध तालुक्यांमध्ये शेतकरी शेकडोंच्या संख्येने सहभागी झाले होते.
जोरदार घोषणा व निदर्शने करत निघालेल्या या मोर्चामुळे गांधीनगर ओव्हर ब्रिज खालील वाहतूक अल्पकाळ विस्कळीत झाली होती. मोर्चामधील महिला शेतकऱ्यांची लक्षणीय उपस्थिती लक्षवेधी ठरत होते. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

बेळगाव जिल्हा हा राज्यातील सर्वात मोठा जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी दोन भाजी मार्केट असतील तर त्याचा फायदा शेतकऱ्यांनाच होणार आहे. याखेरीस जय किसान भाजी मार्केटमधील व्यापारी व जिल्ह्यातील शेतकरी यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध आहेत. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जय किसान भाजी मार्केट अतिशय योग्य आणि सोयीचे आहे.
तेंव्हा जय किसान होलसेल भाजी मार्केट वरील कारवाई मागे घेण्यात यावी. केंद्र शासनाने खाजगी भाजी मार्केट सुरू करण्यास परवानगी दिल्याने नियमानुसार जय किसान भाजी मार्केट सुरू करण्यात आले आहे. मार्केटचे बांधकाम देखील नियमानुसार झाले आहे असे असताना या भाजी मार्केट वर कारवाई करण्याचे कारण काय? असा संतप्त सवाल शेतकरी नेते व व्यापारी यावेळी करत होते.
जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केटच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या आजच्या भव्य मोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालय येथे सांगता झाली आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
कित्तूर राणी चन्नम्मा सर्कलमध्ये हजारोच्या संख्येने व्यापारी या आंदोलन करून बसले आहेत सकाळी 11 वाजता सुरू झालेला मोर्चा दुपारी एकच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात पोहोचला आणि चन्नम्मा सर्कल परिसरात गेल्या एक तासापासून ठाण मांडून बसला आहे.


