बेळगाव लाईव्ह :बेळगाव परिसरातील दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यामध्ये गांजाचे सेवन केलेले दोघेजण, तसेच सार्वजनिक ठिकाणी मटका खेळणारे दोघे असून त्यांच्याकडील रोख 2350 रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे दिलीपकुमार रामतीर्थ निषाद (वय 25, रा. बाबूमोरा, जि. आंबेडकरनगर उत्तर प्रदेश), हिमांशू निषाद (वय 25, रा. हुसेनमोर जि. आंबेडकरनगर उत्तर प्रदेश), संदीप विजय अष्टेकर (वय 28, रा. महाद्वार रोड बेळगाव) आणि किरण वसंत नायक (वय 32, रा. महाद्वार रोड बेळगाव) अशी आहेत.
याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, काल शुक्रवारी पहाटे 4 वाजता बेळगाव -धारवाड एनएच 48 महामार्गावरील कमकारट्टी ब्रिजजवळ एका कंटेनरला अपघात झाल्याची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांना कंटेनरचा चालक व क्लिनर असलेले अनुक्रमे दिलीपकुमार निषाद व हिमांशू निषाद हे दोघे असाधारण वर्तन करत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना ताब्यात घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता दोघांनीही अंमली पदार्थ गांजाचे सेवन केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे दोघांनाही अटक करण्यात आली.
याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दुसऱ्या प्रकरणात काल आरोपी संदीप अष्टेकर व किरण नायक हे दोघे मच्छे गावांमध्ये सार्वजनिक ठिकाणी कल्याण ओसी मटका खेळत होते.
याची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्कप्पा जोडट्टी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धाड टाकून संदीप व किरण यांना रंगेहात पकडून अटक केली. तसेच त्यांच्याकडील रोख 2350 रुपये आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त केल्या. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.


