बेळगाव लाईव्ह : हुक्केरी ग्रामीण विद्युत सहकारी संस्थेच्या निवडणुकीत जारकीहोळी पॅनेलचा पराभव केल्यानंतर, माजी खासदार रमेश कत्ती यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी, “हात टाकू नये त्या ठिकाणी कोणीतरी एकाने हात टाकून आपला हात भाजून घेतला आहे,” अशा शब्दात मंत्री सतीश जारकीहोळींना टोला लगावला आहे. “निवडणूक जिंकण्यासाठी कोणतीही विशेष रणनीती नव्हती. आम्हाला केवळ आमचे घर सुरक्षित ठेवायचे होते. स्वाभिमान सर्वात श्रेष्ठ आहे आणि त्यासमोर पैसा, अहंकार किंवा गुंडगिरी चालत नाही. ‘डमी’ कोण आणि ‘डॅडी’ कोण, हे आम्ही सिद्ध केले आहे,” असे त्यांनी ठामपणे नमूद केले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन सहकार क्षेत्राला पुढे घेऊन जाऊ. लोकशाहीत एकाच घरात जर सर्व जण आमदार किंवा विधान परिषद सदस्य झाले, तर समाजातील लोकांनी काय करायचे? आम्ही सर्वांना प्रत्येक क्षेत्रात पुढे घेऊन जाऊ.” ते म्हणाले की, “सहकार क्षेत्रात ध्रुवीकरण होणे गरजेचे आहे, अन्यथा पुढील पाच वर्षे डीसीसी बँक निवडणूक होणार नाही. आम्ही ३२०० कोटी रुपये ३ लाख २० हजार लोकांना शून्य टक्के व्याजाने डीसीसी बँकेमार्फत कर्ज देण्याचे काम केले आहे. पतसंस्थांनाही सक्षम केले आहे. बँक तेव्हाच वाचेल, जेव्हा सहकार संस्था वाचतील; केवळ पैसा देऊन मते विकत घेतल्याने बँक वाचणार नाही. पुढील पाच वर्षांसाठी डीसीसी बँकेची निवडणूकही होणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘दुपारी १२ वाजता उठून येतात’ या आरोपाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “वैयक्तिक टीका करण्यासाठी आमचे त्यांच्याशी कोणतेही व्यावसायिक संबंध नाहीत. राजकीय स्तरावर आम्ही त्यांना अनेकदा मदत केली आहे आणि त्यांनीही आम्हाला मदत केली आहे. पण, माझे बंधू उमेश कत्ती यांच्या निधनानंतर त्यांच्यात बदल झालेला दिसत आहे आणि अदृश्य हात काम करत असल्याचे दिसून आले आहे. त्यावर आम्ही निर्णय घेतला आहे आणि पुढे वाटचाल करत आहोत,” असे त्यांनी सांगितले. माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या टीकेला जनतेनेच उत्तर दिले आहे, त्यामुळे हा ‘मॅटर क्लोज’ झाला आहे, असे ते म्हणाले. जिल्ह्यातील १५ तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी आपले ठराव योग्य लोकांना द्यावेत, त्याची विक्री करू नये. त्यामुळे डीसीसी बँक आणि सहकार संस्था वाचतील, असे आवाहन त्यांनी केले.



